शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लेखी माफीनामा दिल्यानंतर शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी मंगळवारी गांधीनगर येथे भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली. दिल्लीच्या राजकारणासाठी उत्सुक असलेल्या जोशी यांनी राज्यसभेच्या सातव्या जागेसाठी मोदी यांचा पाठिंबा मिळावा यासाठी ही भेट घेतल्याचे राजकीय सूत्रांचे म्हणणे आहे.
दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेतर्फे उमेदवारी मिळावी यासाठी मनोहर जोशी यांनी यापूर्वी जोरदार प्रयत्न केले.
मात्र उद्धव ठाकरे यांनी जोशी यांच्या उमेदवारीला स्पष्टपणे विरोध केला. त्यानंतर राज्यसभेच्या सातव्या जागेसाठी आपल्या नावाचा विचार करावा ही जोशी यांची इच्छाही डावलण्यात आल्यामुळे त्यांनी पक्षनेतृत्वावर अप्रत्यक्षपणे टीका सुरू केली.
याची गंभीर दखल घेऊन उद्धव ठाकरे यांनी पक्षनेतृत्वाला टीका करणाऱ्यांना पक्षात थारा नाही, असा थेट इशारा देताच मनोहर जोशी यांनी लेखी माफी मागून उद्धव यांच्याशी पुन्हा जुळवून घेतले.
राज्यसभेच्या सातव्या जागेसाठीचा निर्णय मात्र अद्याप झालेला नाही. या पाश्र्वभूमीवर नरेंद्र मोदी यांची गांधीनगर येथे जाऊन जोशी यांनी सदिच्छा भेट घेतल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा