अशोक अडसूळ, लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई :  पंढरीला येणारे वारकरी मोठय़ा भक्तिभावाने विठुरायाचा लाडूचा प्रसाद घेऊन जातात. प्रसादाचा हा लाडू निकृष्ट दर्जाचा असून तो तो तयार होणाऱ्या कारखान्यात स्वच्छतेचा अभाव आहे. या लाडूच्या सेवनाने भक्तांच्या आरोग्याला अपाय होऊ शकतो, असा इशारा लेखापरीक्षण अहवालात नोंदवला आहे. या अहवालाने विठ्ठल मंदिर समितीचा ढिसाळ कारभार उघड झाला आहे. नागपूर येथे विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात ‘श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती’चा वर्ष २०२०-२१ चा लेखापरीक्षण अहवाल व त्यावरील अनुपालन अहवाल सादर झाला.

हेही वाचा >>> “छत्रपती शिवाजी महाराज सूरतला गेले होते म्हणून मी गेलो होतो, मला वाटलं..”, काय म्हणाले भरत गोगावले?

अहवालात काय?

अहवालामध्ये प्रसाद म्हणून देण्यात येणाऱ्या लाडूसंदर्भात गंभीर बाबी समोर आल्या आहेत. लाडू बनवण्याचे काम बचत गट जेथे करतात ती जागा अस्वच्छ आहे. लाडू सुकण्यासाठी कळकट ताडपत्री वापरली जाते.

लाडूच्या पाकिटावर जे घटक नोंदवले जातात, ते वापरले जात नाहीत. लाडू बनवण्यासाठी शेंगदाणा तेल वापरण्याची अट कंत्राटामध्ये नमूद आहे, प्रत्यक्षात सरकीचे तेल वापरले जाते. विठ्ठलाचा प्रसाद म्हणून तीन लाडूंचे पाकीट २० रुपयांना विकले जाते. मात्र या लाडूच्या सेवनाने भक्तांच्या आरोग्यास अपाय होऊ शकतो. होणाऱ्या परिणामास लाडू बनवणाऱ्या बचत गटाबरोबर मंदिर समितीचीसुद्धा तेवढीच जबाबदारी असेल, असा इशारा लेखापरीक्षण करणाऱ्या पुण्याच्या ‘बीएसजी अँड असोसिएट्स’ने नोंदवला आहे.

विठ्ठलाचा प्रसाद म्हणून दिले जाणारे लाडू आता राज्य शासनाच्या अन्न व औषध प्रशासन विभागाकडून प्रमाणित करून घेत आहोत. त्यामुळे प्रसादामध्ये ज्या काही त्रुटी अहवालात नोंदवल्या आहेत, त्या आता राहणार नाहीत. – राजेंद्र शेळके, कार्यकारी अधिकारी, श्री विठृटल मंदिर समिती, पंढरपूर.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shri vitthal rukmini mandir prasad ladoo quality is poor says audit report zws
Show comments