नालासोपारा स्फोटकेप्रकरणी अटकेत असलेल्या श्रीकांत पांगारकरला ६ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी तर वैभव राऊत आणि सुधन्वा गोंधळेकर यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. तर शरद कळसकरला सीबीआय कोठडी सुनावण्यात आली. आज मुंबईत याप्रकरणी सुनावणी झाली.

राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) ऑगस्टमध्ये नालासोपारा येथील हिंदुत्ववादी कार्यकर्ता वैभव राऊतसह पाच कट्टरवाद्यांना शस्त्र, स्फोटकांच्या साठ्याप्रकरणी गैरकृत्ये प्रतिबंधक कायद्यातील(यूएपीए) विविध कलमांनुसार अटक केली. राऊतच्या घरी मोठ्याप्रमाणात शस्त्रसाठा सापडला होता. याप्रकरणी त्याला पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार नंतर सुधन्वा गोंधळेकर, श्रीकांत पांगारकरला आणि शरद कळसकरला अटक करण्यात आली होती. महाराष्ट्रातील काही ठिकाणी स्फोट घडवण्याचे यांचे कारस्थान असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते.