‘राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ या जाहिरातीत सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असल्याचा दावा करण्यात आला. यानंतर भाजपा-शिवसेनेत (शिंदे गट) मतभेद समोर आले. यानंतर विरोधकांकडून या जाहिरातीवर आणि भाजपा-शिंदे गटाच्या युतीवर सडकून टीका करण्यात आली. यावर खासदार श्रीकांत शिंदेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते शनिवारी (१७ जून) कल्याणमध्ये माध्यमांशी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

श्रीकांत शिंदे म्हणाले, “खालच्या स्तरावर होणाऱ्या गोष्टींमुळे एवढ्या मोठ्या युतीवर परिणाम होत नाही. ही युती वेगळ्या विचाराने झाली आहे. एका विचाराने, एका उद्देशाने तयार झालेल्या युतीत इतक्या किरकोळ कारणाने वितुष्ट येणार नाही. आज या ठिकाणी भाजपा-शिवसेनेचे सर्वच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. त्यावरून चित्र स्पष्ट आहे.”

“दोन्हीकडील कार्यकर्त्यांसाठी भावनिक मुद्दा”

“कार्यकर्ते कायम उत्सूक असतात. ते त्यांच्या स्तरावर काही ना काही करत असतात. तो दोन्हीकडील कार्यकर्त्यांसाठी भावनिक मुद्दा असतो. मात्र, आजच्या उपस्थितीवरून सर्व चित्र स्पष्ट आहे. वेगळं सांगण्याची गरज नाही. कार्यकर्ते समजदार असतात,” असं मत श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केलं.

“वादावर पडदा पडण्याचा प्रश्नच नाही”

“वादावर पडदा पडण्याचा प्रश्नच नाही. आम्ही एकत्र आहोत आणि एकत्रच काम करत आहोत. अनेक भूमिपूजनाचे कार्यक्रम झाले. ते सर्व एकत्रच झाले. उगाच वेगळं चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे,” असंही श्रीकांत शिंदेंनी नमूद केलं.

“विरोधकांना दुसरं काही काम उरलेलं नाही”

विरोधकांनी भाजपा-शिंदे गटातील वादावर केलेल्या टीकेवर श्रीकांत शिंदे म्हणाले, “विरोधकांना दुसरं काही काम उरलेलं नाही. भाजपा-शिवसेनेते कसं वितुष्ठ निर्माण होईल, लावालाव्या कशा करायच्या हे सुरू आहे. विरोधकांना बघवत नाही. आमच्यात सर्व गोष्टी चांगल्या सुरू आहेत. आम्ही महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्याचं, विकास करण्याचं काम करू.”

“राज्यात मोठ्या संख्येने कामं सुरू”

“गेल्या ११ महिन्यात या सरकारच्या माध्यमातून जितकी कामं झाली तेवढी याआधी कधी झाली असतील असं मला वाटत नाही. राज्यात मोठ्या संख्येने कामं सुरू आहेत,” असंही श्रीकांच शिंदेंनी नमूद केलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shrikant shinde comment on criticism by opposition on advertisement dispute pbs
Show comments