मुंबई : पुणे जिल्ह्यातील मावळ लोकसभा मतदारसंघातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या निवडणुकीला पराभूत अपक्ष उमेदवार राजू पाटील यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. शिंदे गटाचे नवनियुक्त खासदार रवींद्र वायकर, नरेश म्हस्के यांच्या खासदारकीलाही उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले असून त्याबाबतच्या याचिका प्रलंबित आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत मावळमधून शिंदे गटाचे उमेदवार बारणे हे ६ लाख ९२ हजार ८३२ मते घेऊन विजयी झाले होते. त्यांनी, उद्धव ठाकरे गटाचे संजोग वाघेरे यांचा पराभव करून तिसऱ्यांदा खासदारकी मिळवली होती. या निवडणुकीत ५ लाख ९६ हजार २१७ मते मिळवणारे पराभूत अपक्ष उमेदवार वकील राजू पाटील यांनी बारणे यांचा विजयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. मतमोजणी आणि प्रचारावेळी गैरप्रकार झाल्याचा आरोप पाटील यांनी बारणे यांच्या निवडणुकीला आव्हान देणाऱ्या याचिकेत केला आहे.

हेही वाचा – नवी मुंबईतील गृहखरेदी घोटाळा : मोनार्क युनिव्हर्सलच्या गोपाळ ठाकूर यांना साडेतीन वर्षांनंतर जामीन

हेही वाचा – घाटकोपर फलक दुर्घटना : आरोपी भावेश भिंडेची अटक कायदेशीरच उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

मावळ लोकसभेसाठी करण्यात आलेले मतदान आणि प्रत्यक्ष मतमोजणीतील आकडा यामध्ये जवळपास ५७३ मतांची तफावत आढळून आली. शिवाय, मतमोजणी सुरू असताना अनेक अनोळखी व्यक्ती मतमोजणी केंद्रावर फिरत होत्या. याविषयी रीतसर तक्रार करूनही त्याची दखल न घेतल्याने न्यायालयात याचिका केल्याचा दावा पाटील यांनी याचिकेत केला आहे. तसेच, बारणे यांनी प्रचारादरम्यान धार्मिक ध्रुवीकरण केल्याचा आरोपही याचिकेत केला असून या दाव्याच्या समर्थनार्थ पुरावे याचिकेसह जोडले आहेत. बारणे यांनी धर्माच्या नावावर मते मागितली होती. त्याची तक्रार प्रशासन आणि पोलिसांकडे केली होती. परंतु, त्याची दखल घेतली गेली नाही. यापूर्वी, १९८८ मध्ये असा प्रकार घडला होता. त्यावेळी, त्या तत्कालीन आमदाराची आमदारकी रद्द करण्यात आली होती, असेही पाटील यांनी याचिकेत म्हटले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shrirang barne maval challenge to the election of another mp from eknath shinde group mumbai print news ssb