ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांच्या पत्नी शुभदा यांचे हृदयविकाराच्या झटक्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील करूळ गावी शुक्रवारी निधन झाले. त्या ७९ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती मधु मंगेश कर्णिक, दोन पुत्र व एक कन्या असा परिवार आहे.
मधु मंगेश आणि शुभदा हे काही दिवसांसाठी करूळ या आपल्या गावी घरी गेले होते. शुक्रवारी शुभदा यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना तातडीने कणकवली येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.
शुभदा कर्णिक यांनी अनेक वर्षे मुंबई महापालिकेच्या शाळेत अध्यापनाचे काम केले होते. करूळ गावी कर्णिक कुटुंबीयांनी आपली स्वत:ची जमीन देऊन त्यावर उभारलेल्या ‘शुभदा कर्णिक ग्रंथालया’च्या त्या अध्यक्षा होत्या. कर्णिक दाम्पत्याच्या लग्नाचा साठावा वाढदिवस १० मे रोजी साजरा करण्यात आला होता. त्या निमित्ताने एका विशेष कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. २७ एप्रिल २०१३ रोजी मुंबईत ‘कोमसाप’ने मधु मंगेश कर्णिक यांच्या सहस्त्रचंद्रदर्शन सोहोळ्यानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमातही त्या सहभागी झाल्या होत्या. मधु मंगेश कर्णिक यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘करुळचा मुलगा’ या आत्मचरित्रात मधु मंगेश यांनी शुभदा यांच्याविषयी सविस्तर लिहिले आहे.  
शुभदा यांच्या पार्थिवावर शनिवारी मुंबईत ओशिवरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी कोकण मराठी साहित्य परिषद संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते, मधु मंगेश यांचा मित्र परिवार उपस्थित होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shubhada karnik die
Show comments