गुरुवारपासून सुरू झालेल्या ठाणे-कर्जत आणि कसारा शटल सेवेच्या ठाणे-कसारा शटलमध्ये पहिल्याच दिवशी बिघाड झाल्याने दुरुस्तीसाठी यार्डमध्ये न्यावी लागली आणि शटलच्या स्वागतासाठी उभे असलेले नागरिक तसेच प्रवासी संघटनांचे अधिकारी यांना दोन तास खोळंबून राहावे लागले. तीन वर्षांनतर सुरू झालेली ही सेवा पहिल्याच दिवशी ठप्प झाल्याने प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण होते.
ठाणे यार्डाचे रिमॉडेलिंग आणि अपुऱ्या गाडय़ा यामुळे २०११-१२ रेल्वे बजेटमध्ये रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी ठाणे, कल्याणमधून कसारा कर्जतसाठी ३२ फेऱ्या सुरू करण्याची केलेली घोषणा कागदावरच राहिली होती. गुरुवारपासून ठाण्यातून कर्जतसाठी पाच, बदलापूर आणि कर्जतसाठी दोन, आसनगावसाठी तीन, कल्याण-कर्जतसाठी एक, कल्याण-आसनगावसाठी तीन, सीएसटी-कल्याणसाठी चार आणि दादर-कल्याणसाठी दोन अशा फेऱ्या वाढविण्यात येणार होत्या. दुपारी २ वाजून १२ मिनिटांनी ठाण्यातून सुटलेली शटल ५ वाजून १७ मिनिटांनी कसारा येथून निघणार होती, पण ही शटल टिटवाळ्यापर्यंत येताच तिच्यात तांत्रिक बिघाड झाल्याने पुढे जाऊ शकली नाही, अशी माहिती एका रेल्वे प्रवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्याने दिली. तसेच ही शटल दुरुस्तीसाठी नेल्यावर ती रद्द झाली असल्याची माहिती पुढील स्थानकांवर देण्यात आली नाही. यामुळे प्रवाशांना ताटकळत उभे राहावे लागल्याने त्यांच्यामध्ये संतापाचे वातावरण होते.