श्याम मानव यांच्याकडून कुटुंबव्यवस्थेला तोडण्याचे काम सुरू असल्याचा आरोप सनातन संस्थेच्या अनुयायी स्वाती, प्रिती आणि प्रिया या तिघींनी गुरूवारी केला. श्याम मानव यांनी केलेल्या आरोपांवर स्पष्टीकरण देण्यासाठी सनातन संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी या तिघींनी श्याम मानव यांनी केलेले आरोप फेटाळून लावले. आम्ही स्वत:च्या मर्जीने सनातनच्या आश्रमात आलो, आम्हाला कोणीही जबरदस्तीने आणले नाही. संस्थेतील मुलींना संमोहित केल्याचा आरोपही खोटा आहे. सनातनमध्ये कोणत्याही प्रकारचे संमोहन होत नसून आम्ही स्वखुशीने येथे आलो आहोत. त्यामुळे श्याम मानव यांनी केलेले सर्व आरोप दुर्देवी आहेत, असे सनातनची साधक प्रीती यावेळी म्हणाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उत्तर प्रदेशातल्या भदोईच्या चौरसिया परिवारातील प्रीती आणि प्रिया यांना संमोहित करून सनातनच्या आश्रमात डांबल्याचा आरोप, चौरसिया कुटुंबियांनी केला आहे. मात्र त्याला आज प्रीती आणि प्रिया यांनी उत्तर दिले. आम्ही स्वत:च्या मर्जीने सनातनच्या आश्रमात आल्याने करण्यात आलेले आरोप दुर्देवी असल्याचे स्पष्टीकरण साधक प्रीती आणि प्रिया या दोघा बहिणींनी दिले.  स्वत:च्या मुलींवर आरोप करणाऱ्या प्रिया आणि प्रीतीच्या कुटुंबियांना लाज वाटायला हवी, सनातनची साधक स्वाती यावेळी म्हणाली. तर, श्याम मानव यांचा आजवर आदराने उल्लेख करीत आले पण त्यांनी केलेल्या बेछुट आरोपांमुळे त्यांची खरी प्रतिमा समोर आली आहे. त्यांच्याबद्दल आता आदर उरलेला नाही. त्यांनी केलेल्या आरोपांमुळे अतीव दु:ख झाल्याचेही स्वाती पुढे म्हणाली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shyam manav breaking family system allegation by sanatan