सह्याद्रीच्या कुशीत आणि माळशेजच्या डोंगररांगेत वसलेला सिद्धगड किल्ला म्हणजे ट्रेकर्सचे आवडते ठिकाण. दुरून आडदांड दिसणाऱ्या या किल्ल्यावर शिवकालीन इतिहासाचे अवशेष आहेत. पावसाळय़ात मात्र हा परिसर निसर्गसौंदर्याने नटतो आणि डोंगराच्या कुशीतून अनेक विलोभनीय धबधबे प्रसवतात. या पर्वतरांगेत असलेले पाच-सहा धबधबे पर्यटकांना मोहित करतात आणि साप्ताहिक सुट्टीच्या काळात येथे पर्यटकांची झुंबड उडते.
मुरबाड-कर्जत रस्त्यावरील म्हसा या गावातून सिद्धगड परिसरात जाता येते. म्हासावरून भीमाशंकर अभयारण्याच्या पायथ्याशी असलेल्या जांभुर्डे गावातून येथे जाता येते. जांभुर्डे गावाच्या परिसरातच अभयारण्यात अनेक धबधबे नजरेस पडतात. सिद्धगड किल्ल्याच्या पायथ्याशी बोरवाडीजवळ असलेला उंचावरून फेसाळणारा धबधबा पर्यटकांना आकर्षित करतो.
तब्बल ५०० फूट उंचावरून तीन धारेमध्ये कोसळणारा हा धबधबा अतिशय विलक्षण वाटतो. उंचावरून थेट कोसळणारा हा धबधबा अजस्त्र वाटतो. मात्र सुरक्षित असल्याने या धबधब्याच्या प्रपाताखाली थेट उभे राहून या अजस्त्र जलधारा अंगावर घेता येतात. धबधब्याखाली उतारावरून पाणी खाली वाहते आणि पुढे त्याचे जलाशयात रूपांतर झालेले आहे. या जलाशयात अनेक जण मनसोक्त डुंबण्याचा आणि चिंब सहल साजरी करण्याचा आनंद घेतात. मात्र उतारावरील भाग खडकाळ व शेवाळयुक्त असल्याने तिथे जरा जपूनच पावले टाकावी लागतात. उतारावरून वाहणाऱ्या पाण्यात अनेक जण घसरगुंडीचा आनंद घेतात, मात्र त्यामुळे अपघात होण्याची शक्यता अधिक असते. या परिसरातील धबधबे पर्वतरांगेत आणि अभयारण्यात असल्याने तिथे काळजी घेणे गरजेचे आहे. भीमाशंकर अभयारण्यातील हा परिसर असल्याने जंगलभ्रमंती करता येते. मात्र त्यासंबंधीची आणि परिसराची अधिक माहिती असणे आवश्यक आहे.
बोरवाडी गावामध्ये क्रांतिवीर भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांची समाधी असून ‘हुतात्मा स्मारक’ म्हणून ते प्रसिद्ध आहे. स्वातंत्र्ययुद्धात सहभागी होणाऱ्या या क्रातिवीरांना सिद्धगड किल्ल्यावर वीरमरण आले होते, त्यांच्या स्मरणार्थ येथे हुतात्मा स्मारक उभारण्यात आले. हुतात्मा स्मारक असल्याने या परिसरात पावित्र्य राखणे गरजेचे आहे. स्थानिक आदिवासींकडून या स्मारकाभोवती आणि परिसरातील कचरा, प्लॅस्टिकचे तुकडे साफ केले जातात, पण पर्यटकांनीही काळजी घेणे गरजेचे आहे.
कसे जाल?
सिद्धगड धबधबा
- कल्याण-अहमदनगर महामार्गावर मुरबाडहून कर्जतकडे जाण्याचा मार्ग आहे. या रस्त्यावर म्हसा नावाचे गाव लागते. म्हसावरून जांभुर्डेला जाण्यासाठी फाटा फुटतो. जांभुर्डेहून सिद्धगड परिसरात जाता येते.
- मुरबाडहून नारिवली, बोरवाडी, जांभुर्डेकडे जाणाऱ्या एसटी बस सुटतात.