मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या निर्घृण हत्येशी संबंधित खटल्यात आपल्याला हस्तक्षेप करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी सिद्दीकी यांच्या पत्नीने शुक्रवारी विशेष न्यायालयात अर्जाद्वारे केली. या घटनेने आपले कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. त्यामुळे, या घटनेशी संबंधित तथ्ये आपल्याला न्यायालयासमोर सादर करायची असून तसे करणे महत्त्वाचे आहे, असे शेहझीन सिद्दीकी यांनी अर्जात म्हटले आहे.
विशेष मोक्का न्यायालयाचे न्यायाधीश बी. डी. शेळके यांनी शेहझीन यांच्या अर्जाची दखल घेतली व त्यावर ७ एप्रिल रोजी सुनावणी ठेवली. शहरातील सर्वात श्रीमंत आणि गजबजलेल्या परिसरात सिद्दीकी यांच्यावर हल्ला करण्यात आला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. या परिसरातील नागरिकांना सोयीसुविधा मिळण्यासाठी सिद्दीकी यांनी अथक परिश्रम केले. अशा नेत्याच्या हत्येमुळे त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सिद्दीकी यांच्या मृत्यूमुळे आपले कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. त्यामुळे, हे प्रकरण निष्पक्ष निष्कर्षापर्यंत नेण्याच्या दृष्टीने न्यायालयाला मदत करायची आहे. त्यासाठी प्रकरणाशी संबंधित तथ्य न्यायालयाला सांगायची असून आपल्यासाठी ते अत्यंत महत्त्वाचे आहे, असे शेहझीन यांनी अर्जात म्हटले आहे.
माजी आमदार बाबा सिद्दीकी (६६) यांची गेल्यावर्षी १२ ऑक्टोबर रोजी रात्री वांद्रे (पूर्व) परिसरातील त्यांचा मुलगा झिशान यांच्या कार्यालयाबाहेर तीन हल्लेखोरांनी गोळ्या घालून हत्या केली होती. सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गंत (मोक्का) कारवाई करण्यात आली. गुन्हे शाखेने या प्रकरणी विशेष मोक्का न्यायालयात अटक आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केले असून त्यात अनमोल बिश्णोई याने आपल्या संघटित गुन्हेगारी टोळीच्या सदस्यांसह दहशत आणि वर्चस्व निर्माण करण्याचा उद्देशाने सिद्दिकी यांच्याविरोधात कट रचून त्याची अंमलबजावणी केल्याचा दावा केला होता. आरोपपत्रात एकूण २९ जणांना आरोपी करण्यात आले असून त्यापैकी २६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तुरुंगात असलेला गुंड लॉरेन्स बिश्णोई याचा भाऊ अनमोल याच्यासह मोहम्मद यासीन अख्तर आणि शुभम लोणकर या तिघांना फरारी आरोपी दाखवण्यात आले आहे.
याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ८८ जणांचे जबाब नोंदवले असून झिशान सिद्दीकी यांच्यासह एकूण १८० साक्षीदारांची यादी आरोपपत्रासह जोडण्यात आली आहे. याव्यतिरिक्त पाच बंदुका, सहा मॅगझिन आणि ३५ भ्रमणध्वनी हस्तगत केल्याचेही पोलिसांनी आरोपपत्रात नमूद केले आहे.