रेल्वेच्या जमिनींचा व्यापारी पद्धतीने विकास कसा करायचा यासाठी ‘मुंबई रेल्वे विकास महामंडळा’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कोटय़वधी रुपये खर्चून केलेल्या विदेश दौऱ्यांचा खर्च महामंडळाने नव्हे तर ‘सिमेन्स’ कंपनीच्या सौजन्याने झाला असल्याचे उघड झाले आहे. या अधिकाऱ्यांनी विदेशवारी केल्यानंतर काही अहवाल दिले का, त्या अहवालांचा काही फायदा झाला का असे अनेक प्रश्न विचारले जाऊ लागले आहेत.
मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या (एमआरव्हीसी) विविध पदांवरील अधिकाऱ्यांनी २००३-४ ते २०१२-१३ या १० वर्षांत केलेल्या प्रत्येक विदेश वारीवर महामंडळाने सरासरी २,४१,९६४ रुपये खर्च केला आहे. यापैकी २०१२-१३ मध्ये ३८,१८,१८५ रुपये केवळ वीजवाहक तारांचे (ओव्हरहेड वायर) निरीक्षण आणि तांत्रिक कारणासाठी ‘अभ्यास दौऱ्या’वर खर्च झाले आहेत. यापैकी काही दौरे ‘सिमेन्स’ कंपनीच्या सौजन्याने झाले असल्याची माहिती, माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यात हाती आली आहे.
रेल्वेच्या जमिनींचा व्यापारी विकास करून किंवा त्यांची विक्री करून त्यातून उपलब्ध होणाऱ्या निधीतून मुंबईचे रेल्वे विकास प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहेत. मात्र प्रकल्पांसाठी निधी नाही, असे सांगत अनेक प्रकल्पांचे काम मंदावले आहे. हा विकास कसा करायचा याच्या अभ्यासासाठी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक पी. सी. सहगल, ए. के. वर्मा आणि राकेश सक्सेना यांनी विदेश दौरे केलेच; पण व्यवस्थापकीय संचालकांचे सचिव आर. पी. भावे यांनीही विदेश दौऱ्याची हौस पुरवून घेतली आहे. चेतना कुमार आणि अतुल मोहन या अधिकाऱ्यांनीही विदेश दौरा केला. पण अद्याप त्यांनी सादर केलेल्या अहवालाचा कोणताही उपयोग रेल्वेच्या प्रकल्पाला झालेला नाही. सिमेन्सच्या सहकार्याने प्रकल्प संचालक विष्णु कुमार आणि आर. पी. भावे यांनी विदेश दौरे केले आहेत.
सर्वाधिक दौरे व्यवस्थापकीय संचालक पी. सी. सहगल यांनी केले असून चार दौरे ए. के. वर्मा यांनी केले आहेत. विद्यमान व्यवस्थापकीय संचालक राकेश सक्सेना यांनी केवळ एक दौरा केला आहे. इंग्लंड, चीन, जपान, ऑस्ट्रीया, फ्रान्स, पोर्तुगाल, जर्मनी, स्वीत्झर्लंड, मलेशिया, दक्षिण कोरीया, अमेरिका आदी देशांना त्यांचे अभ्यास दौरे झाले आहेत.
अन्य अधिकाऱ्यांचे विदेश दौरे
चेतना कुमार (१७ जानेवारी २००३) : स्पेन आणि इंग्लंड
अतुल मोहन (२४ जानेवारी २००७ आणि १४ मे २००७) : इंग्लंड, जर्मनी, ऑस्ट्रीया आणि हॉलंड
विष्णु कुमार (१४ ऑगस्ट २००६ आणि २८ मे २००७) : जर्मनी, जपान, हाँगकाँग, सिंगापूर आणि ऑस्ट्रेलिया
आर. पी. भावे (४ मार्च २००८) : जर्मनी आणि ऑस्ट्रीया
संजय मित्तल : जपान, हाँगकाँग आणि सिंगापूर
पी. एच. ओक : जपान, हाँगकाँग, सिंगापूर