मध्य रेल्वेच्या एका गाडीत दोन चाकांना जोडणाऱ्या ‘बोल्स्टर’ला तडे
मध्य रेल्वेच्या प्रवाशांना जुन्या गाडय़ांच्या तुलनेत अधिक आरामदायक प्रवासाचा अनुभव देणाऱ्या सिमेन्स गाडय़ांपैकी एका गाडीच्या बोगीमधील बोल्स्टर नावाच्या महत्त्वाच्या भागाला तडे गेल्याचे निदर्शनास आले आहे. ही बाब गंभीर असून आता मध्य रेल्वेच्या ताफ्यातील सर्व सिमेन्स गाडय़ांची कसून तपासणीचे आदेश दिले आहेत. सध्या तडा गेलेली ही गाडी कुर्ला कारशेडमध्ये दुरुस्तीसाठी दाखल झाली आहे.
उपनगरीय गाडीच्या प्रत्येक डब्याखाली असलेल्या चाकांच्या पोलादी भागाला ‘बोगी’ असे म्हणतात. सध्या सिमेन्स गाडय़ांच्या प्रत्येक बोगीमध्ये दोन-दोन चाकांचे दोन भाग दोन टोकांना असतात. ही दोन-दोन चाके एकमेकांना जोडणाऱ्या आडव्या पट्टीला बोल्स्टर म्हणतात. हा भाग अत्यंत महत्त्वाचा असतो. बोगीवर येणारा भार बोल्स्टरमुळे दोन्ही चाकांवर विभागला जात असल्याने डब्याचे वजन सांभाळले जाते.
गेल्या आठवडय़ात मध्य रेल्वेच्या ताफ्यातील सिमेन्स गाडय़ांपैकी एका गाडीच्या एका डब्याच्या बोल्स्टरला तडा गेल्याचे देखभाल-दुरुस्तीदरम्यान आढळले. ही गाडी कुर्ला-कारशेडमध्ये नियमित देखभाल दुरुस्तीसाठी गेली असता तेथे हा बिघाड दिसून आल्याचे कारशेडमधील एका अधिकाऱ्याने गोपनीयतेच्या अटीवर सांगितले. याबाबत मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली आहे.
या प्रकारानंतर या गाडीची दुरुस्ती कुर्ला कारशेडमध्ये सुरू झाली आहे. त्याचबरोबर मध्य रेल्वेच्या ताफ्यातील सर्वच्या सर्व सिमेन्स गाडय़ांच्या प्रत्येक डब्याच्या बोगीची तपासणी करण्याच्या सूचना मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाचे रेल्वे व्यवस्थापक रवींद्र गोयल यांनी दिल्या आहेत. बोल्स्टरला तडा जाणे ही बाब गंभीर मानली जात असली, तरी तो देखभाल-दुरुस्तीचा एक भाग आहे. त्यामुळे या सूचना दिल्या आहेत, असेही गोयल यांनी स्पष्ट केले.