‘एसआयईएस’ या संस्थेतर्फे देण्यात येणारे ‘श्रीचंद्रशेखरेंद्र सरस्वती राष्ट्रीय पुरस्कार’ जाहीर झाले असून यंदा ते अमिताभ बच्चन, तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ सॅम पित्रोदा, लोकसभेच्या विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज आणि चिन्मय मिशनचे स्वामी तेजोमयानंद यांना घोषित झाले आहेत. कांची महास्वामी महोत्सवाच्या कार्यक्रमाचा भाग म्हणून देण्यात येणारे हे पुरस्कार २५ डिसेंबर रोजी प्रदान करण्यात येतील. हा कार्यक्रम षण्मुखानंद सभागृहात होणार आहे.
‘साउथ इंडियन एज्युकेशन सोसायटी’तर्फे हा राष्ट्रीय प्रतिष्ठा पुरस्कार १९९८ पासून प्रदान करण्यात येतो. हा पुरस्कार कांची पीठाचे शंकराचार्य चंद्रशेखरेंद्र सरस्वती यांच्या स्मरणार्थ दिला जातो. चंद्रशेखरेंद्र सरस्वती यांच्या निधनानंतर एसआयईएसचे अध्यक्ष व्ही. शंकर यांनी या पुरस्कारांची सुरुवात केली. हा पुरस्कार सामाजिक नेतृत्त्व, विज्ञान व तंत्रज्ञान, सामाजिक विचारवंत आदी क्षेत्रांतील महनीय व्यक्तींना प्रदान करण्यात येतो. गेल्या वर्षी हा पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार, डॉ. जयंत नारळीकर यांना प्रदान करण्यात आला होता. प्रत्येकी अडीच लाख रुपये, मानपत्र, दीप असे या पुरस्काराचे स्वरूप असते.   

Story img Loader