लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : कांदिवलीतील चारकोप परिसरात सोनेरी कोल्ह्याचे (गोल्डन जॅकेल) दर्शन झाले. दरम्यान, बचाव पथक आणि वन अधिकाऱ्यांनी या कोल्ह्याला नैसर्गित अधिवासात सोडले.
कांदिवलीत चारकोप परिसरातील एका इमारतीत मंगळवारी सायंकाळी एक सोनेरी कोल्हा आढळला. प्रथमदर्शी रहिवाशांना तो कुत्रा असावा असे वाटले. मात्र, काही वन्यप्रेमींनी तो कुत्रा नसून सोनेरी कोल्हा असल्याची खात्री केली. कोल्ह्याची सुटका करण्यासाठी तात्काळ बचाव पथकाला पाचारण करण्यात आले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत त्यांनी कोल्ह्याच्या सुटकेसाठी प्रयत्न केले. कोल्ह्याला पिंजऱ्यात जेरबंद करून तात्काळ नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
आणखी वाचा-अकरावी प्रवेश प्रक्रिया पहिल्या विशेष फेरीसाठी सर्वांना अर्ज करण्याची संधी
दरम्यान, सोनेरी कोल्हा कांदळवन परिसंस्थेतील प्रमुख सस्तन प्राणी आहे. मुंबईचा पश्चिम किनारा, मध्य मुंबई आणि नवी मुंबईतील काही भाग, तसेच ठाणे खाडीच्या आसपास असलेल्या कांदळवनामुळे जैवविविधतेला मोठ्या प्रमाणावर आधार मिळाला आहे. यामध्ये प्रामुख्याने सोनेरी कोल्हा दृष्टीस पडतो. मागील अनेक वर्षांपासून मुंबई महानगरात कांदळवनाच्या भागात कोल्हे आढळून आले आहेत. अनेक वेळा विक्रोळी, कांजूरमार्ग, कांदिवली, ऐरोली, विरार, चेंबूर येथील कांदळवन क्षेत्रालगतच्या मानवी वस्तीत सोनेरी कोल्हा शिरल्याच्या घटना घडल्या आहेत.
सोनेरी कोल्ह्याच्या ठिकाणांचा, मार्गाचा अभ्यास झालेला नाही. सोनेरी कोल्हा युरोप, आफ्रिका, आशियाच्या काही भागात आढळतो. मुंबईत खाडीलगत, कांदळवनात सोनेरी कोल्हा दिसतो. सोनेरी कोल्हा हा वन्यजीव संरक्षण कायदा, १९७२ च्या अनुसूची तीन अंतर्गत संरक्षित आहे.