महाराष्ट्र भाजप अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करायची यावरून भाजपनेते नितीन गडकरी आणि गोपीनाथ मुंडे यांच्यातील वाद विकोपाला गेला असून भाजप आमदार देवेंद्र फडणवीस आणि विद्यमान अध्यक्ष सुधीर मुनगंटीवर यांच्याऐवजी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांच्या गळ्यात प्रदेशाध्यक्षपदाची माळ पडण्याचे संकेत मिळत आहेत.
महाराष्ट्रातील पक्षांतर्गत राजकारणावर आपलेच वर्चस्व राहावे यासाठी गोपीनाथ मुंडे आणि नितीन गडकरी यांच्यात तीव्र संघर्ष निर्माण झाला आहे. गडकरींना शह देण्यासाठी गोपीनाथ मुंडे यांनी प्रदेशाध्यक्षपदासाठी नागपूरच्या देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा आग्रह धरला.
फडणवीस अध्यक्ष झाल्यास नागपूरमधील आपल्या स्थानाला धोका निर्माण होईल हे लक्षात घेऊन गडकरी यांनी मुनगंटीवार यांनाच पुन्हा प्रदेशाध्यक्ष करण्याचा आग्रह धरला.  देवेंद्र फडणवीस यांची स्वच्छ प्रतिमा, अभ्यासू व आक्रमक स्वभाव आणि वय लक्षात घेऊन त्यांना थेट विरोध करणे गडकरी यांनाही शक्य नव्हते. त्यामुळे माझा फडणवीस यांना विरोध नाही. मात्र अध्यक्षपदी मुनगंटीवार यांचीच नियुक्ती व्हावी, असा आग्रह त्यांनी दिल्लीत पक्षश्रेष्ठींकडे धरला होता.
या पाश्र्वभूमीवर आगामी लोकसभा व राज्यातील विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन पक्षाध्यक्ष राजनाथ सिंह यांनी सहमतीचे प्रयत्न करून पाहिले. मंगळवारी मुंबई भेटीदरम्यानही त्यांनी पक्षाध्यक्षपदाची कोंडी फोडण्याचा प्रयत्न केल्याचे भाजपच्या एका नेत्याने सांगितले. मात्र नितीन गडकरी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला थेट विरोध केल्यामुळे विनोद तावडे यांचे नाव पर्याय म्हणून पुढे आले. तावडे हे मुंडे विरोधक म्हणून ओळखले जात असले तरी अलीकडच्या काळात त्यांनी मुंडे यांच्याशी जुळवून घेण्यास सुरुवात केली आहे.
तावडे यांचे संघपरिवाराशी असलेले संबंध आणि प्रदेशाध्यक्षपदाचा वाद चिघळणे पक्षाच्या हिताचे नाही, असा मुद्दा भाजपच्या काही नेत्यांनी राजनाथ सिंह यांच्याकडे उपस्थित केल्यानंतर विनोद तावडे यांचे नाव पुढे आल्याचे एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले.
गडकरी यांना दुखावून फडणवीस यांना प्रदेशाध्यक्ष करणे शक्य नाही आणि मुंडे यांचा विरोध पत्करून मुनगंटीवार यांना अध्यक्षपदी ठेवता येणार नाही. अशा परिस्थितीत मुंडे-गडकरी वादात विनोद तावडे यांच्या पोळीवर प्रदेशाध्यक्षपदाचे ‘तूप’ पडणार असल्याचे भाजप वर्तुळात बोलले जाते.

Story img Loader