मुंबई: वडाळा ते मानखुर्द दरम्यान लोकल रेल्वे वाहतूक ठप्प झाल्यामुळे एरवी तोट्यात धावणाऱ्या मोनोरेलकडे प्रवाशांची पावले सोमवारी वळली. चेंबूर, वडाळा, दादर, लालबाग, महालक्ष्मी असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी मोनोरेलला पसंती दिली. सोमवारी मोनोरेलच्या प्रवासी संख्येत लक्षणीय वाढ झाली. दररोज सायंकाळी ७ वाजेपर्यंत मोनोरेल मार्गिकेवरुन जिथे अंदाजे १२ हजार प्रवासी प्रवास करतात, तिथे सोमवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत १८ हजारांहून अधिक प्रवाशांनी मोनोरेलमधून प्रवास केला.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) चेंबूर ते जेकब सर्कल अशी २० किमीच्या मोनोरेल मार्गिकेची बांधणी करण्यात आली आहे. मात्र ही मार्गिका सेवेत दाखल झाल्यापासून तोट्यात आहे. या मार्गिकेवरील प्रवासीसंख्या वाढविण्यासाठी, मार्गिकेला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी एमएमआरडीएकडून बरेच प्रयत्न होत आहेत. मात्र त्यानंतरही मोनोरेल मार्गिकेवरील प्रवासी संख्या वाढताना दिसत नाही. दिवसाला काही हजार प्रवासी या मार्गिकेवरुन प्रवास करतात. अशावेळी सोमवारी मात्र मोनोरेल मार्गिकेवरील प्रवाशी संख्येत बरीच वाढ दिसून आली. जिथे दररोज दुपारी दोन वाजेपर्यंत सहा हजार प्रवासी मोनोरेलने प्रवास करतात तेथे सोमवारी दुपारी दोन वाजेपर्यंत दहा हजार प्रवाशांनी प्रवास केला.
हेही वाचा >>>बजरंग सोनावणेचं वक्तव्य, “माझ्या विजयाचं श्रेय मनोज जरांगेंचं, कारण…”
हार्बर मार्गावरील वडाळा ते मानखुर्द लोकल सेवा मुसळधार पावसामुळे सोमवारी सकाळपासून दुपारपर्यंत बंद होती. तर चुनाभट्टी, सायनसह अन्य रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने त्याचाही फटका लोकल सेवेला बसला. लोकल नसल्याने चेंबूर, अॅन्टाॅप हिल, लोअर परळ, चिंचपोकळी, दादर, नायगाव, जीटीबी नगर अशा ठिकाणी जाण्यासाठी प्रवाशांनी मोनोरेलचा पर्याय निवडला. त्यामुळेच दुपारी दोननंतरही प्रवासी संख्येत वाढ दिसून आल्याची माहिती एमएमआरडीएतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. दुपारी दोन वाजेपर्यंत एकूण दहा हजार अशी असलेली मोनोरेलची प्रवाशी संख्या सायंकाळी सात वाजता १८ हजारांपर्यंत गेली. त्यातून एमएमआरडीएच्या महसूलातही सोमवारी वाढ झाली.
मुसळधार पावसात लोकल सेवा कोलमंडली असताना मोनोरेल मार्गिकेवरील गाड्या सुरळीत आणि वेळेत धावत होत्या. महानगर आयुक्त डॉ संजय मुखर्जी यांच्या आदेशानुसार मागील काही महिन्यात मोनो गाड्यात अनेक बदल करण्यात आले आहेत. परिणामी मोनो गाड्या सुरळीत धावत असल्याचे चित्र आहे. अशात दररोज प्रवाशांची प्रतीक्षा असलेल्या मोनोरेलला सोमवारी प्रवाशांनी भरघोस प्रतिसाद दिला, मोनोला पसंती दिली. प्रवाशांच्या अडचणीत मोनोरेल धावून आली.