अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या गलथान कारभाराचा आणखी एक नमुना समोर आला आहे. महामंडळाची घटक संस्था असलेल्या विदर्भ साहित्य संघाच्या तत्कालीन पदाधिकाऱ्यांच्या कथित गैरव्यवहारप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा ठराव महामंडळाच्या विद्यमान अध्यक्ष उषा तांबे यांनी तीन वर्षे स्थगित ठेवला असल्याची माहिती महामंडळाच्या सूत्रांकडून देण्यात आली. येत्या १ एप्रिल पासून महामंडळाचे कार्यालय महाराष्ट्र साहित्य परिषद (पुणे) या घटक संस्थेकडे जाणार असून तेव्हा तरी यावर अंमलबजावणी होते की नाही याकडे महामंडळाच्या सदस्यांचे लक्ष लागले आहे.    
विदर्भ साहित्य संघाच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या कथित गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या चौकशी समितीने ४ लाख ६५ हजार रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवला होता. ही रक्कम संबंधितांकडून वसूल केली जावी अन्यथा त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, असा ठराव २५ मार्च २०१० रोजी झालेल्या बैठकीत मंजूर झाला. त्यावेळी महामंडळाचे मुख्य कार्यालय मराठवाडा साहित्य परिषद या घटक संस्थेकडे होते. त्यानंतर हे कार्यालय मुंबई मराठी साहित्य संघ या घटक संस्थेकडे आल्यानंतर त्यावर कार्यवाही होणे अपेक्षित होते. मात्र गेली अडीच ते तीन वर्षे हा ठराव स्थगित ठेवण्यात आला असून उषा तांबे यांनी त्यावर कोणतीही कार्यवाही केलेली नाही.
साहित्य महामंडळाचे कार्यालय २००४ ते २००७ या कालावधीत विदर्भ साहित्य संघाकडे होते. या काळात हा कथित गैरव्यवहार झाला होता. चौकशी समितीच्या ठपक्यानंतर विदर्भ साहित्य संघाच्या संबंधित पदाधिकाऱ्यांनी सुमारे ६० हजार रुपयांची रक्कम महामंडळाकडे व्यक्तिगतरित्या भरली. मात्र अद्याप संपूर्ण रक्कम वसूल झालेली नाही याकडेही सूत्रांनी लक्ष वेधले.
महामंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत हा विषय पुन्हा चर्चेला आला. महामंडळाचे कार्यालय आपल्याकडे येणार असल्याने या विषयाचा पूर्णपणे सोक्षमोक्ष लावण्यात यावा, अशी भूमिका ‘मसाप’च्या पदाधिकाऱ्यांनी घेतली. या विषयाबाबत तांबे यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी ‘आपण आत्ता व्यग्र आहोत, नंतर संपर्क साधते’ असा लघुसंदेश पाठवला. दोन-सव्वादोन तासांनी पुन्हा त्यांच्याशी वारंवार संपर्क साधला असता त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. तर ‘मसाप’च्या विद्यमान कार्याध्यक्ष डॉ. माधवी वैद्य यांनी, महामंडळाच्या कार्यकारिणी बैठकीत होणाऱ्या विषयांवरील चर्चा जाहीर करणे आपल्याला योग्य वाटत नसल्याचे सांगून या विषयावर अधिक भाष्य टाळले.