मागील पाच महिने आझाद मैदानावर शांततेत आंदोलन केल्यानंतर उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे जल्लोषात स्वागत करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांपैकी काहींनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी अचानक मोर्चा नेते तिथे आक्रमकपणे आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी घोषणाबाजी करण्याबरोबरच चप्पलफेक देखील केली. या घटनेमुळे एकच खबळबळ उडाली होती. शिवाय राजकीय वर्तुळात देखील तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. अचानक घडलेल्या या घटनेनंतर आंदोलनकर्त्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्यात आली असून, न्यायालयाने कालच त्यांना १३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यानंतर आता या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज माध्यमांना प्रतिक्रिया देताना, ”गुप्तचर विभागाने कळवूनही पोलिसांनी हवा तेवढा बंदोबस्त ठेवला नाही.” असं बोलून दाखवलं आहे.
“याबाबत रीतसर चौकशी सुरू आहे आणि या चौकशीत पोलिसांना जी काही माहिती मिळत आहे, ती माहिती पोलीस न्यायालयात सादर करत आहेत. त्यामुळे त्यासंदर्भात नक्की चौकशीचा भाग काय आहे, काय नाही? हे आता न्यायालयात प्रकरण प्रलंबित असताना, उघड करणे काही योग्य होणार नाही.” असं दिलीप वळेस पाटील म्हणाले आहेत.
तसेच, “ही गोष्ट खरी आहे की ४ एप्रिल रोजी गुप्तचर विभागाने पत्र लिहून कळवलं होतं, तरी देखील कमतरता राहिली. जेवढ्याप्रमाणात बंदोबस्त ठेवायला हवा होता, तेवढा ठेवला गेला नाही. या संदर्भात चौकशी आदेशीत केलेली आहे. संबंधित पोलीस आयुक्तांची बदली केली आहे, गावदेवीच्या पोलीस निरीक्षकास निलंबित केलेलं आहे. चौकशी सुरू आहे, आणखी चौकशीत जे काही समोर येईल त्यानुसार कारवाई करू.” असंही यावेळी गृहमंत्री वळेस यांनी बोलून दाखवलं.
गुणरत्न सदावर्ते यांना १३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी; जाणून घ्या काय घडलं कोर्टात?
याचबरोबर, आयएनएस विक्रांत प्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपा नेते किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांच्यावर घोटाळ्याचा आरोप केला असून, सोमय्या पिता-पुत्र बेपत्ता असल्याचं दिसत आहे. या पार्श्वभूमीवर विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना गृहमंत्री वळसे पाटील यांनी, “आम्ही केंद्राला विचारू की तुमची सुरक्षा असलेले लोक कुठे आहेत. आरोप करणं सोपं असतं, परंतु स्वत:वर आरोप झाले की त्याला सामोरं जायचं नाही, हे काही फार शूरपणाचं लक्षण नाही.”असं बोलून दाखवलं.