राज्य विधानसभेच्या २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपला सर्वाधिक १२२ जागा मिळाल्या होत्या. भाजपला राज्यात मिळालेले हे आतापर्यंतचे सर्वाधिक यश. १९९०च्या दशकात भाजपने राज्यात ‘शत प्रतिशत’चा नारा दिला होता. पण भाजपला हे उद्दिष्ट अद्याप तरी गाठता आलेले नाही. कारण गेल्या वेळी सर्वाधिक जागा मिळाल्या तरी भाजपला १४४ जादूई आकडा गाठण्याकरिता शिवसेनेची मदत घ्यावी लागली होती. आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेबरोबर युती कायम ठेवण्याचे संकेत भाजपने दिले आहेत.
भाजपची स्थापना एप्रिल १९८० मध्ये झाली असली तरी पहिल्या निवडणुकीपासून भारतीय जनसंघ हा राज्याच्या निवडणुकीच्या रिंगणात आहे. आधी मुंबई प्रांत व नंतर स्वतंत्र महाराष्ट्र राज्याच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनसंघाने भाग घेतला होता. १९५७ मध्ये झालेल्या मुंबई प्रांताच्या निवडणुकीत जनसंघाला चार जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर १९६७ मध्ये चार जण जनसंघाचे निवडून आले होते. १९७२ मध्ये भारतीय जनसंघाचे पाच आमदार निवडून आले होते. १९७८च्या विधानसभा निवडणुकीत जनसंघ हा जनता पक्षाच्या माध्यमातून निवडणूक लढला होता. तेव्हा जनता पक्षाला सर्वाधिक ९९ जागा मिळाल्या होत्या. पण जनता पक्षाचे विधिमंडळात नेतृत्व कोणी करावे यावरून समाजवादी आणि जनसंघाच्या नेत्यांमध्ये वाद झाला होता. समाजवाद्यांनी निहाल अहमद यांच्या नावाचा आग्रह धरला होता, तर जनसंघाच्या आमदारांनी उत्तमराव पाटील यांच्या नावाचा पुरस्कार केला होता. शेवटी पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले होते.
१९८० मध्ये भाजपने राज्य विधानसभेची निवडणूक पहिल्यांदा लढविली होती. तेव्हा भाजपचे १४ आमदार निवडून आले होते. १९९० मध्ये भाजपचे ४२ उमेदवार विजयी झाले होते. त्यानंतर भाजपची कमान चढतीच राहिली.
१९९५ मध्ये भाजप शिवसेनेबरोबर सत्तेत सहभागी झाला होता. त्यानंतर २०१४ मध्येच भाजपला सत्ता मिळाली. १९९१ मध्ये छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना विधिमंडळ पक्षात फूट पडल्यावर भाजपकडे विरोधी पक्षनेतेपद आले होते. त्यानंतर २००९ मध्ये भाजपला विरोधी पक्षनेतेपद मिळाले. गोपीनाथ मुंडे आणि एकनाथ खडसे यांनी राज्य विधानसभेत भाजपच्या वतीने विरोधी पक्षनेतेपद भूषविले. २०१४ मध्ये सत्ता मिळाल्यावर देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रिपदी निवड झाली होती.
भाजपच्या स्थापनेनंतर राज्यात निवडून आलेले आमदार
१९८० – १४
१९८५ – १६
१९९० – ४२
१९९५ – ६५
१९९९ – ५६
२००४ – ५४
२००९ – ४६
२०१४ – १२२