चेंबूर येथील एका कार्यक्रमात सुप्रसिद्ध पार्श्वगायक सोनू निगम याला धक्काबुक्की झाल्याचा प्रकार सोमवारी रात्री उशीरा घडला. या प्रकाराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायल होऊ लागला आहे. ठाकरे गटाचे आमदार प्रकाश फातर्पेकर यांचे पुत्र स्वप्नील फातर्पेकर आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांवर सोनू निगमला धक्काबुक्की करण्याचा आरोप आहे. सोनू निगमनं यासंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी वातावरण तापत असतानाच आरोपी ठाकरे गटाच्या आमदारांचा मुलगा असल्यावरून राजकीय टीका-टिप्पणीही होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर प्रकाश फातर्पेकर यांच्या कन्या आणि ठाकरे गटाच्या नेत्या सुप्रदा फातर्पेकर यांनी घडलेला घटनाक्रम ट्विटरवर सांगितला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेमकं काय घडलं?

२० फेब्रुवारी रोजी चेंबूरमध्ये एका कॉन्सर्टमध्ये सोनू निगम यांच्या गायनाचा कार्यक्रम पार पडला. यानंतर ते स्टेजवरून खाली उतरत असताना त्यांना धक्काबुक्की झाल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. स्वप्नील फातर्पेकर यांनी सोनू निगम यांना पकडून त्यांच्यासमवेत सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात त्यांच्या सुरक्षारक्षकांशी बाचाबाची झाली. या प्रयत्नात सोनू निगम यांच्यासमवेत असणाऱ्या काही व्यक्तींना धक्काबुक्की झाली. एक व्यक्ती खालीही पडली. खुद्द सोनू निगम यांनाही धक्काबुक्की झाल्याचा दावा त्यांनी स्वत: केला आहे. याप्रकरणी पोलीस तक्रारही दाखल करण्यात आली आहे.

सुप्रदा फातर्पेकर यांचं स्पष्टीकरण

दरम्यान, या प्रकरणावरून वाद सुरू झालेला असताना स्वप्नील फतर्पेकर ठाकरे गटाचे आमदार प्रकाश फातर्पेकर यांचे चिरंजीव असल्याच्या मुद्द्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. यासंदर्भात प्रकाश फातर्पेकर यांच्या कन्या सुप्रदा फातर्पेकर यांनी स्पष्टीकरणादाखल ट्वीट केले आहेत. या ट्वीटच्या माध्यमातून त्यांनी सोनू निगम यांची माफीही मागितल्याचं स्पष्ट केलं आहे.

“चेंबूरमधील कार्यक्रमाची आयोजक म्हणून तेव्हा नेमकं काय घडलं, याविषयी सत्य समोर मांडण्याची माझी इच्छा आहे. तो एक दुर्दैवी प्रकार होता. श्री सोनू निगम कार्यक्रमानंतर स्टेजवरून खाली उतरत असताना माझा भाऊ त्यांच्यासह सेल्फी काढण्याच्या प्रयत्नात होता. पण तिथल्या गर्दीमुळे थोडा गोंधळ उडाला. या प्रयत्नात खाली पडलेल्या व्यक्तीला झेन रुग्णालयात तपासणीसाठी दाखल करण्यात आलं होतं. तपासणीनंतर त्यांना सोडण्यात आलं आहे”, असं सुप्रदा फातर्पेकर यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

VIDEO: “बच गया, नही तो मर जाता”, धक्काबुक्कीच्यावेळी काय घडलं? स्वतः सोनू निगमनेच सांगितलं, म्हणाला…

“सोनू निगम यांना कोणतीही दुखापत नाही”

दरम्यान, सोनू निगम यांना कोणतीही दुखापत झाली नसल्याचं सुप्रदा फातर्पेकर यांनी ट्वीटमध्ये नमूद केलं आहे. “जे काही घडलं त्याबद्दल आयोजकांच्या वतीने आम्ही सोनू निगम आणि त्यांच्या टीमची माफी मागितली आहे. त्यामुळे कृपया कोणत्याही निराधार अफवांवर विश्वास ठेवू नका. या मुद्द्याचं राजकारण करणाऱ्यांवर विश्वास ठेवू नका”, असंही फातर्पेकर यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, चेंबूर पोलिसांनी या प्रकरणी तक्रार दाखल करून घेतली असून गुन्हा दाखल केला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Singer sonu nigam attacked in chembur shivsena mla son accused daughter clarifies pmw