अलिकच्या काळात बरीच गाणी आली आणि गेलीही परंतू जुन्या गाण्यांची गोडी आजही कायम आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पाश्र्वगायक सुरेश वाडकर यांनी ठाणे येथे केले. येथील गडकरी रंगायतन येथे आयोजित ‘पी सावळाराम स्मृती समारोह सोहळ्या’त ते बोलत होते. यावेळी वाडकर यांना ‘पी सावळराम स्मृती पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. यावेळी आपल्या विनोदी शैलीत त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी महापौर हरिषच्छंद्र पाटील, महापालिकेचे माहिती व जनसंपर्क अधिकारी संदीप माळवी यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ पाश्र्वगायिका पुष्पा पागधरे यांचा ‘गंगा जमुना’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
जनकवी पी सावळाराम यांच्या नावाने पुरस्कार मिळणे हे भाग्यच आहे अशी भावना वाडकर यांनी व्यक्त केली. ठाणे हे कला जोपासणारे खरे शहर आहे असे वाडकर यांनी सांगितले. पुढील वर्षांपासून या सोहळ्याअंतर्गत संगीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीही देण्यात यावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच कलाची वाढ होण्यासाठी सर्वानीच एकत्र येऊन प्रयत्न करणे गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले. सावळाराम यांनी एका चित्रपटासाठी लिहलेले गाणे गाण्याची संधी मिळाली तो क्षण अतिशय आनंद देणारा होता अशी भावना ज्येष्ठ पाश्र्वगायिका पुष्पा पागधरे यांनी व्यक्त केली. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी बजावणाऱ्या ठाणेकरांचाही सत्कार करण्यात आला. गणेश जेठे यांना ‘उदोयोन्मुख कलाकार’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शिक्षण क्षेत्रासाठी ठाणे महाविद्यालयाच्या विज्ञान विभागाच्या अधिष्ठाता डॉ.माधुरी पेजावर यांना तर साहित्य क्षेत्रासाठी ज्येष्ठ इतिहास तज्ञ वि.ह.भुमकर यांना सन्मानित करण्यात आले. समाजाची साहित्याची भूक भागविण्यासाठी यापुढेही कसोशीने प्रयत्न करणार असल्याचे वि.ह.भुमकर यांनी सांगितले. यावेळी ‘धागा धागा अखंड विणूया’ हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.   

Story img Loader