सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या कारभारावर अध्यापकांची टीका
पुणे येथील सिंहगड संस्थेच्या अभियांत्रिकीसह बहुतेक महाविद्यालयांमध्ये अध्यापक-कर्मचाऱ्यांना दोन ते पाच महिने पगार देण्यात आलेला नसतानाच मावळ तालुक्यातील कुसगाव येथील संस्थेच्या जागेत गोल्फ क्बलचे काम मात्र जोरात सुरू आहे. गोल्फ क्लबसाठी खर्च करणारे संस्थाचालक पगार का देत नाहीत, असा सवाल येथील अध्यापकांनी उपस्थित केला असून गंभीर बाब म्हणजे गोल्फ क्लबसाठी मोठय़ा प्रमाणात डोंगर फोडून माती उत्खनन सुरू आहे. मावळच्या तहसीलदारांनी याप्रकरणी संस्थेला काम थांबविण्याची नोटीस बजावल्यानंतरही रस्त्याचे काम सुरूच आहे.
सिंहगड तंत्रशिक्षण संस्थेत सुमारे साडेआठ हजार अध्यापक व कर्मचारी असून गेले काही महिने यातील बहुतेकांना पगार देण्यात आलेला नसल्यामुळे संस्थेच्या अभियांत्रिकी व वैद्यकीय महाविद्यालयासह बहुतेक महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी हवालदिल झाले आहेत. संस्थेच्या वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकीय अध्यापकांनी अलीकडेच पगार मिळण्यासाठी आंदोलनही केले होते. या पाश्र्वभूमीवर लोणावळा मावळ तालुक्यातील कुलगाव येथे सिंहगड संस्थेची आठ महाविद्यालये असून येथे गोल्फ क्लब बांधण्याचे काम जोरात सुरू आहे. यासाठी रस्ता तयार करण्यासाठी मोठय़ा प्रमाणात डोंगर फोडण्याचे काम सुरू असून कुसगावमधील ग्रामपंचायत सदस्यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यापासून जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत सर्वाकडे तक्रारी केल्या आहेत. शासनाकडून विद्यार्थ्यांच्या शुल्कापोटीचे १२१ कोटी रुपये न आल्यामुळे पगार देण्यात अडचण असल्याचे संस्थेचे अध्यक्ष मारुती नवले यांचे म्हणणे आहे.
कोणतीच परवानगी घेतलेली नाही
कॉलेजच्या बांधकामाच्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा आधार घेऊन परवानगी न घेता आता रस्त्यासाठी डोंगर खोदता येत नाही. तसेच जे गौणखनिज उत्खनन करण्यात आले आहे त्यासाठी दंड भरावाच लागेल. संस्थेने गोल्फ क्लब अथवा रस्ता बांधणीसाठी आमच्याकडे कोणतीही परवानगी मागितलेली नाही. सर्व काम परवानगीशिवाय असल्यामुळे ३० जानेवारी २०१३ रोजी आम्ही काम थांबविण्याची नोटीस दिली. मात्र त्यानंतरही रस्त्याचे काम व माती उत्खननाचे काम सुरूच राहिल्याने पुन्हा नोटीस देण्यात आली आहे. उत्खनन केलेल्या गौणखनिजाची मोजणी करून दंड आकारला जाईल. हा दंड कोटी रुपयांपर्यंत होऊ शकतो. तथापि, प्रत्यक्ष मोजणीनंतरच दंडाची रक्कम सांगता येईल. त्याचप्रमाणे माळीण येथील दुर्घटना लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून संस्थेने केलेल्या खोदकामामुळे भविष्यात कोणती दुर्घटना घडण्याची शक्यता आहे का त्याचा तपास राष्ट्रीय भूगर्भ संस्थेतर्फे केला जाईल.
-शरद पाटील, तहसीलदार, मावळ, पुणे जिल्हा