मुंबई : मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेत अत्यंत महत्त्वाचा असलेला शीव उड्डाणपूल गुरुवार, १ ऑगस्टपासून वाहतुकीसाठी पूर्णत: बंद केला जाणार आहे. हा उड्डाणपूल पाडण्यात येणार आहे. वांद्रे-कुर्ला संकुल, कुर्ला एलबीएस मार्ग, धारावी आणि शीव यांना जोडणारा हा उड्डाणपूल बंद झाल्याने मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या अधिकच बिकट होणार आहे.
हेही वाचा >>> मुंबई: शेकडो बालकांची पालकांशी पुनभेट
हा ११२ वर्षे जुना उड्डाणपूल जीर्ण झाल्याने पाडण्यात येणार आहे. तसेच तो सीएसएमटी-कुर्ला दरम्यान प्रस्तावित पाचव्या-सहाव्या मार्गाच्या कामात अडथळाही ठरत आहे. गेल्या महिन्यात उड्डाणपुलावरून अवजड वाहतूक बंद करण्यात आली होती. जुलै २०२६ पर्यंत, दोन वर्षांच्या कालावधीत नवा पूल बांधण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
सुमारे ५० खर्च अपेक्षित
मध्य रेल्वे, मुंबई महापालिकेच्या समन्वयाने नवा उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. प्रस्तावित उड्डाणपूल ‘सिंगल स्पॅन सेमी-थ्रू गर्डर्स (२)’ पद्धतीचा तसेच ४९ मीटर लांब आणि २९ मीटर रुंद आरसीसी स्लॅबचा असेल. त्यासाठी सुमारे २३ कोटी रुपये मध्य रेल्वे आणि २६ कोटी रुपये महापालिका खर्च करणार आहे. मुंबई आयआयटीने स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्टमध्ये उड्डाणपूल पाडण्याची आणि त्याजागी स्टील गर्डर आणि आरसीसी स्लॅबसह नवा उड्डाणपूल बांधण्याची शिफारस केली होती.