मुंबई महानगरपालिकेच्या लोकमान्य टिळक सर्वसामान्य रुग्णालयातील शस्त्रक्रियागार सहाय्यक पदांची भरती करताना १५ सेवाजेष्ठ चतुर्थश्रेणी कामगारांवर अन्याय करण्यात आला. मात्र आश्वासनाशिवाय पदरात काहीच पडत नसल्याने कामगारांमध्ये प्रचंड नाराजी पसरली होती. कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी सोमवारी म्युनिसिपल मजदूर युनियनने न्याय मिळेपर्यंत उपोषण आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. या आंदोलनाची दाखल घेत महानगरपालिका प्रशासनाने चर्चेसाठी पुढाकार घेतला आणि दोन दिवसांत अहवाल सादर करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.
हेही वाचा >>> मुंबईः वृद्ध दाम्पत्यावर नोकराचा हल्ला,७२ वर्षीय वृद्धाचा मृत्यू, पत्नी जखमी
लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसामान्य रुग्णालयातील शस्त्रक्रियागार सहाय्यक पदांची भरती करताना पात्र ३८ सेवाजेष्ठ चतुर्थश्रेणी कामगारांची व्यवसाय चाचणी घेण्यात आली. यापैकी २३ कामगार उत्तीर्ण, तर १५ सेवाजेष्ठ कामगार अनुत्तीर्ण झाले. आपले काम अत्यंत प्रामाणिकपणे करणाऱ्या कामगारांना व्यवसाय चाचणीत अनुत्तीर्ण करण्यात अले असून सेवाजेष्ठ कामगारांना डावलण्याचे षडयंत्र असल्याचा आरोप कामगारांकडून करण्यात येत होता. प्रशासनाच्या या निर्णयामुळे अन्याय झालेल्या कामगारांमध्ये नाराजी पसरलेली आहे.
हेही वाचा >>> मुंबई : दारूच्या नशेत वारंवार बॉम्बस्फोटाची धमकी देणाऱ्या सराईत आरोपीला अटक
यासंदर्भात म्युनिसिपल मजदूर युनियनने शीव रुग्णालयाच्या अधिष्ठातासह महानगरपालिका आयुक्तांना पत्र पाठवून व्यथा मांडली होती. मात्र आश्वासनांशिवाय पदरात काहीच पडले नाही. यामुळे म्युनिसिपल मजदूर युनियनने कर्मचाऱ्यांच्या मागणीसाठी सोमवारी उपोषण आंदोलन केले. या आंदोलनाची महानगरपालिका उपायुक्त संजय कुऱ्हाडे आणि वैद्यकिय शिक्षण व प्रमुख रुग्णालये संचालक डॉ. नीलम अंद्राडे यांनी दाखल घेऊन म्युनिसिपल मजदूर युनियनचे पदाधिकारी आणि संबंधित कामगारांसोबत चर्चा केली. यावेळी चार सदस्य समिती स्थापन करून दोन दिवसांत अहवाल सादर करण्याचे आश्वासन प्रशासनाच्या वतीने देण्यात आले, त्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात येत असल्याची माहिती म्युनिसिपल मजदूर युनियनचे मुंबईचे सहाय्यक सरचिटणीस प्रदीप नारकर यांनी दिली.