पावसाच्या पुनरागमनानंतर मलमपट्टी गायब; वाहतूक कोंडीत भर
गेल्या महिन्यात झालेल्या मुसळधार पावसानंतर उखडून गेलेल्या शीव-पनवेल महामार्गाची सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेली मलमपट्टी नुकत्याच सुरू झालेल्या पावसात वाहून गेली आहे. खड्डय़ांमधील खडी पावसामुळे वाहून रस्त्यावर पसरल्याने खड्डय़ांसोबतच खडी चुकवत मार्गक्रमण करण्याची वेळ वाहनांवर आली आहे. त्यातच खड्डे भरण्याच्या कामामुळे वाहतुकीत आणखी अडथळा निर्माण होत आहे.
तब्बल १२०० कोटींपेक्षा अधिक खर्च करून चकचकीत करण्यात आलेल्या शीव-पनवेल महामार्गाची गेल्या काही महिन्यांत पुरती दुर्दशा झाली आहे. जुलै महिन्यातील मुसळधार पावसामुळे या रस्त्यावरील खड्डे आणखी रुंदावले. त्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या वाहनांचा वेग मंदावला. परिणामी शीव येथून पनवेलपर्यंत जाण्यासाठी वाहनांना नेहमीच्या वेळेपेक्षा ५० मिनिटे अधिक वेळ लागत आहे. याबाबत आरडाओरड सुरू झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले आहे. मात्र, खड्डय़ांमध्ये केवळ खडी टाकून ते बुजवण्यात येत आहेत. सध्या सुरू असलेल्या पावसात ही खडी वाहून जात असल्याने खड्डे पुन्हा निर्माण होत आहेत. त्यामुळे या मार्गावरील वाहतुकीचा बोजवारा उडत आहेत.
पावसामुळे खड्डे भरण्यास विलंब होत असल्याची सबब सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने महिनाभरापूर्वी दिली होती. मात्र, गेले महिनाभर पावसाचा जोर कमी असतानाही खड्डे बुजवण्याचे काम संथगतीने सुरू असल्याचे दिसून येत आहे.
खड्डे कुठे?
अण्णा भाऊ साठे उड्डाणपूल, चेंबूर पांजरापोल सर्कल, मानखुर्द ट्रॉम्बे उड्डाणपुलाखाली, मानखुर्द उड्डाणपूल, वाशी खाडीपूल, वाशी टोल नाक्याच्या पुढे, वाशी गाव, वाशी उड्डाणपूल, तुर्भे उड्डाणपूल, तुर्फे पोलीस ठाणे, बेलापूर उड्डाणपूल, नेरुळ उड्डाणपूल, खारघर उड्डाणपूल उतरल्यानंतर, खारघर टोल नाका
शीव-पनवेल मार्गावरील खड्डे भरण्यास अजूनही १५ दिवसांचा अवधी लागणार आहे. त्यानंतर ज्या ठिकाणी डांबरी रस्ता आहे. तिथे सिमेंटचा रस्ता तयार करण्यात येणार आहे.
किशोर पाटील- अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग मुंबई मंडळ.