रसिका मुळय़े, लोकसत्ता
मुंबई : शासन दुरुस्ती करत नाही आणि खासगी संस्थांकडून निधी घेण्याची मुभा नाही अशा पेचात सर ज. जी. महाविद्यालय गेली कित्येक वर्षे सापडले आहे. कला, उपयोजित कला महाविद्यालयांसह आवारातील इतर महाविद्यालयांच्या इमारतीची दुरुस्तीही वर्षांनुवर्षे पूर्ण झालेली नाही.
सर ज. जी. कला महाविद्यालयाच्या आवारातील जुन्या इमारतीला ऐतिहासिक वारसा दर्जा आहे. त्यामुळे तेथे बदल किंवा दुरुस्ती करण्यास मर्यादा आहेत. मात्र, आवारातील इतर इमारती नव्या असल्याने त्यांची दुरुस्ती करणे किंवा त्या जागी नवी इमारत बांधणे शक्य आहे. असे असतानाही सर ज. जी. महाविद्यालयातील प्राध्यापक आणि शिक्षकांना मात्र जुन्या, जीर्ण इमारतींमध्येच दिवस ढकलावे लागत आहेत. बदलती परिस्थिती, वाढलेली पटसंख्या
यामुळे महाविद्यालयांना असलेली जागाही कमी पडू लागली आहे. त्यावर उपाय म्हणून नवी इमारत बांधण्याचा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे महाविद्यालयाने दिलेल्या प्रस्तावावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. आहे त्या इमारती वापरण्याजोग्या राहाव्यात यासाठी उपयोजित कला महाविद्यालयाने २०१६ मध्ये दुरुस्तीचा प्रस्ताव दिला होता. तेव्हापासून सुरू असलेली दुरुस्ती अद्यापही सुरूच आहे. कला महाविद्यालय, वास्तुकला महाविद्यालयाची स्थितीही थोडय़ाफार फरकाने अशीच आहे.
इमारती गळत आहेत, स्वच्छतागृहांची स्थितीही चांगली नाही, अशी माहिती संस्थेतील विद्यार्थ्यांनी दिली. एका इमारतीतील स्वच्छतागृहे, वर्गखोल्या यांना दारे बसवण्यात आली, मात्र अनेक महिने त्याला कडय़ा लावलेल्या नाहीत. ऐतिहासिक वारसा दर्जा इमारतीच्या दारांना पूर्वी जुनी पितळी कडय़ा होत्या, त्या काढून तेथे अॅल्युमिनिअमच्या कडय़ा बसवण्यात आल्या आहेत. जुनी वास्तू देखणी आहे. तिचे सौंदर्य टिकवण्यासाठी तिची वेळोवेळी काळजी घेणे आवश्यक आहे, अशी अपेक्षा यातील माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
लालफितीत अडकलेली गुणवत्ता..
विद्यार्थ्यांना अद्ययावत सामग्री मिळावी म्हणून महाविद्यालयाकडून करण्यात येणाऱ्या प्रयत्नांना शासनाने मात्र फारशी साथ दिली नसल्याचे दिसते आहे. महाविद्यालयाने अद्ययावत संगणक घेण्यासाठी दिलेल्या प्रस्तावावर शासनाने जवळपास दोन वर्षे काहीच केले नाही. त्यानंतर माहिती तंत्रज्ञान विभागाची परवानगी मिळाल्यानंतर प्रस्ताव मंजूर करून निधी दिला. मात्र, तोपर्यंत महाविद्यालयाने मागणी केलेल्या संगणकाच्या आणखी दोन अद्ययावत आवृत्त्या बाजारात दाखल झाल्या होत्या. मात्र, मंजुरी आधीच्या आवृत्तीला मिळाल्यामुळे महाविद्यालयाला तीच घ्यावी लागली, असा किस्सा महाविद्यालयातील प्राध्यापकांनी सांगितला. महाविद्यालयाच्या परिसराचा विकास आणि देखभालीचा आराखडा करण्यासाठी महाविद्यालयातील प्राध्यापकांनी पुढाकार घेऊन समिती तयार केली. त्यात वास्तुकला महाविद्यालयातील प्राध्यापकही होते. मात्र, त्या समितीला अद्यापही शासनाने मान्यता दिलेली नाही.
शासकीय कार्यालयांची घुसखोरी
सर जमशेटजी जीजीभॉय यांच्या देणगीतून आणि नाना शंकरशेठ यांनी दिलेल्या जमिनीवर १८५७ मध्ये ही संस्था स्थापन झाली. स्वातंत्र्यानंतर सर्व जमिनी शासनाच्या ताब्यात गेल्या, तशीच ज.जी. महाविद्यालयाची जमीन, इमारतही शासनाची झाली. कला शिक्षण, प्रसारासाठी स्थापन झालेल्या या संस्थेच्या आवारात शासकीय कार्यालयांची घुसखोरी सुरू झाली. सध्या कला संचालनालय, सार्वजनिक बांधकाम विभागाचे एक कार्यालय आणि तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अखत्यारीत असणारे पिंट्रिंग टेक्नॉलॉजीचे महाविद्यालय या आवारात आहे.