मुंबई : सर ज. जी. कला महाविद्यालयासह उपयोजित कला महाविद्यालय, वास्तूकला महाविद्यालयाचे (जे.जे.) रूपांतर राज्याचे कला विद्यापीठ म्हणून करण्याच्या शासकीय हालचाली थंडावल्या आहेत. राज्य विद्यापीठ स्थापन करण्याबाबत नेमण्यात आलेली समिती शासनाने रद्द केल्याने आता ‘जे.जे.’ अभिमत विद्यापीठाचा मार्ग मोकळा झाला आहे.
समृद्ध वारसा लाभलेल्या सर ज. जी. कला महाविद्यालयासह उपयोजित कला आणि वास्तूकला महाविद्यालयाला अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळावा, यासाठी साधारणत: २०१७ पासून प्रयत्न करण्यात येत होते. विद्यापीठा अनुदान आयोगाच्या (यूजीसी) तज्ज्ञ समितीपुढे दोन वेळा सादरीकरण, कागदपत्रांची छाननी, त्रुटींची पूर्तता असे सर्व सोपस्कार झाल्यानंतर या संस्थेला अनन्य स्वायत्त दर्जासह (डी नोव्हो) अभिमत विद्यापीठ सुरू करण्यास तत्वत: मंजुरी मिळाली. मात्र, त्यानंतर या संस्थेत राज्याचे कला विद्यापीठ थाटण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. शासनाच्या या धोरण विसंगतीवर ‘लोकसत्ता’ने प्रकाश टाकला होता.
एकीकडे अभिमत दर्जा मिळवण्यासाठी संस्थेचे काम सुरू असताना शासनाने राज्य विद्यापीठ करण्यासाठी समिती स्थापन केली होती. मात्र आता ही समिती शासनाने रद्द केली आहे. त्यामुळे सर ज. जी. महाविद्यालयाला अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
अभिमत विद्यापीठा झाल्यानंतर..
सर जमशेटजी जीजीभॉय यांच्या एक लाख रुपयांच्या देणगीतून १८५७ साली स्थापन करण्यात आलेली ही संस्था शासकीय जमिनीवर आहे. अभिमत दर्जा मिळण्यासाठी संस्थेची स्थावर मालमत्ता स्वतंत्र ट्रस्ट किंवा कंपनीच्या नावे करावी लागेल. संस्थेच्या नावात अनुषंगिक बदल करावे लागतील. त्याचबरोबर प्राध्यापकांची भरती, पायाभूत सुविधांची निर्मिती, अभ्यासक्रमाची निर्मिती करावी लागेल.