आमदार गोपाळ शेट्टी यांचा आरोप
महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांच्या नावात सीता आणि राम दोन्ही असले तरी काँग्रेसजनांना खूष करण्यासाठी त्यांनी ‘रामकथे’ला विरोध केल्याचा आरोप कागदपत्रांसह भाजपचे बोरीवली येथील आमदार गोपाळ शेट्टी यांनी आज केला.
बोरिवली येथील महापालिकेच्या मैदानात मुरारीबापू एप्रिल महिन्यात रामकथा सप्ताह करणार होते. त्यासाठी त्यांच्या स्थानिक भक्तांनी डिसेंबर महिन्यात महापालिकेकडे रितसर परवानगीही मागितली होती. मात्र या सप्ताहाचा फायदा भाजपला मिळू शकतो या भूमिकेतून स्थानिक काँग्रेसच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे मैदानावर परवानगी मिळू नये यासाठी पाठपुरावा केला. काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांच्या विनंतीनुसार मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांना पाचारण करून नियमावलीत आवश्यक ते बदल करण्यास सांगितले. यातील गंभीर बाब म्हणजे न्यायालयाच्या आदेशानुसार नियमावली अस्तित्वात असतानाही कुंटे यांनी धोरणात्मक बदल करणारी नवीन नियमावली पालिकेतील सत्ताधारी शिवसेना-भाजप व अन्य पक्षांना विश्वासात न घेता करून टाकल्याचा आरोप पालिका मुख्यालयात गोपाळ शेट्टी यांनी पत्रकार परिषद घेऊन केला.
‘एमआरटीपी’ कायद्यानुसार पालिकेचे मैदान वर्षांतून ३० दिवस आणि एका वेळी १२ दिवसापेक्षा जास्त नाही इतक्या कालावधीसाठी खेळाव्यतिरिक्त सास्कृतिक कार्यक्रमांसाठी देण्याचा नियम आहे. मात्र मुख्यमंत्र्यांना खूश करण्यासाठी पालिका आयुक्तांनी नवीन परिपत्रक काढल्यामुळे कोणत्याही मैदानात भागवत सप्ताह अथवा जैन धर्मियांना सांस्कृतिक कार्यक्रम करता येणार नाही, असे गोपाळ शेट्टी म्हणाले. मुंबईतील रस्त्यांवर पालिकेची कोणतीही परवानगी न घेता राजरोस नजाम पढले जातात त्याबाबत आयुक्त कुंटे काय करणार आहेत, असा सवालही शेट्टी यांनी केला. पालिका आयुक्तांच्या आदेशामुळे पालिकेच्या कोणत्याही खेळाच्या मैदानावर यापुढे १५ एप्रिल ते १५ जून या कालावधीत लग्नसमारंभांसह कोणतेच कार्यक्रम करता येणार नाहीत. मुळात डिसेंबरमध्ये रामकथेसाठी परवानगी मागितली असताना त्यावर तात्काळ निर्णय होत नाही आणि मुख्यमंत्र्यांना सांगताच धोरणात्मक बाब असूनही महापालिका सभागृहाला विश्वासात न घेता थेट परिपत्रक बदलून मोकळे होतात हा नगरसेवकांचा अपमान असल्याचेही ते म्हणाले.

Story img Loader