कुरघोडीच्या राजकारणाचा सामान्यांना फटका
उजनी धरणातील पाणी पिण्यासाठी कालव्यांमध्ये सोडावे या मागणीसाठी गेल्या ४७ दिवसांपासून सोलापूर जिल्ह्य़ातील शेतकरी मुंबईत आझाद मैदान ठिय्या मारून बसले आहेत. परंतु पाण्याअभावी तगमगणाऱ्या या शेतकऱ्यांची दखलही सरकारने अद्याप घेतलेली नाही. तर दुसरीकडे याच उजनी धरणातील पाणी १९ किमी. लांबीच्या बोगद्यातून माढा मतदारसंघात सोडले जात आहे. त्यातही धरण १०० टक्के भरलेले असले तरच या बोगद्यात पाणी सोडावे हा नियम असूनही तो धाब्यावर बसवून हे पाणी सोडण्यात आले आहे. सर्वसामान्य जनता आणि मातब्बर पुढाऱ्यांचे क्षेत्र या विषम लढाईत स्वाभाविकच सर्वसामान्य जनतेचीच हार होत आहे
निसर्गाने पाठ फिरवल्याने सोलापूर जिल्ह्य़ातील काही भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पिण्यासाठी उजनी धरणाचे पाणी उजव्या व डाव्या कालव्यांमध्ये सोडावे या मागणीसाठी ४७ दिवसापासून या परिसरातील शेतकऱ्यांनी मुंबईत धरणे धरले आहे. पण आघाडी सरकारमधील श्रेयाच्या राजकारणामुळे कालव्यात पाणी सोडण्यात येत नाही. या राजकारणाचा फटका कालव्यालगतच्या सुमारे १५० हून अधिक गावांना बसत आहे. कालव्याशेजारी गाव असूनही साध्या पिण्याच्या पाण्यासाठी त्यांना मैलौन्मैल पायपीट करावी लागत आहे.
उजनी धरणासाठी आणि कालव्यासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत त्यांनाही पिण्यासाठी पाणी दिले जात नाही. परंतु दुसरीकडे उजनी धरण १०० टक्के भरल्याशिवाय माढा-सिना बोगद्यात पाणी सोडू नये, असा कायदा असतानाही राजकीय दबावापोटी कायदे धाब्यावर बसवून या १९ कि.मी.च्या बोगद्यात पाणी सोडले जात आहे.
या पाश्र्वभूमीवर दोन दिवसांत कालव्यांमध्ये पाणी सोडले न गेल्यास आझाद मैदानात आत्मदहन करण्याचा इशारा ‘सोलापूर जिल्हा जनहीत शेतकरी संघटने’चे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी दिला आहे.

नदीपात्रातील वाळू काढण्याचे ठेके देताना नदीपात्रात पाणी असणे अनिवार्य असते. भीमा नदीच्या पात्रातील वाळू काढण्याचे कंत्राट देता यावे यासाठीही भीमेमध्ये पाणी सोडण्यात येते. परंतु पिण्यासाठी मात्र पाणी सोडले जात नाही, अशी खंत देशमुख यांनी व्यक्त केली.

Story img Loader