मुंबई : महानगर टेलिफोन निगम लिमिटेड कंपनीने माटुंगा पोलीस ठाण्यात केबल चोरीची तक्रार केली होती. त्याप्रकरणी ३१ मेला दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांमध्ये सहा आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. आरोपींनी महापालिका कर्मचारी बनून ६ लाख ८० हजार रुपयांची केबल चोरल्याचा आरोप आहे.
मनीष मगनलाल जैन, निक्कू चनीलाल गुप्ता, नरेश गोपाल अहिरे, महेश मल्लेश बुडामुला, अशोक रमेश सूर्यवंशी, कैलास देवदत्त जाधव अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी १८४ किलो तांबे जप्त केले आहे. दादर टीटी सर्कल ते माहेश्वरी उद्यानाच्या दिशेने डॉ.बाबासाहेब आंबेडकर रोडवर चोरांच्या टोळीने अनोख्या पद्धतीने चोरी केली. कोणालाही संशय येऊ नये म्हणून चोरांनी महापालिकेच्या बॅरिकेड्सचा वापर केला. त्या बॅरिकेट्सवर काम सुरू असल्याचे लिहिले होते. त्यानंतर या चोरट्यांनी ३५० मीटर रस्ता खोदून सहा लाख ८० हजार रुपये किमतीचे तांबे चोरले.
हेही वाचा…रोज ‘म.रे.’ त्याला.., कल्याणहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल १५ मिनिटे उशिराने
परिसरातील दूरध्वनी बंद असल्याची तक्रार आल्यानंतर एमटीएनएल पथकाने पाहणी केली. त्यावेळी परिसरातील केबल चोरीला गेल्याचे आढळून आले. त्यानंतर एमटीएनएलने माटुंगा पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. माटुंगा पोलीस ठाण्याचे प्रभारी दीपक चव्हाण यांनी पीएसआय संतोष माळी यांच्याकडे तपास सोपवला. तपास अधिकाऱ्याने सीसी टीव्ही कँमेऱ्यातील चित्रण आणि खबऱ्यांच्या माध्यमातून माहिती गोळा करून सहा चोरट्यांना अटक केली. आरोपींना १३ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे.