लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : निकृष्ट दर्जाच्या कामामुळे पदपथ खचल्याची घटना शुक्रवारी रात्री मुलुंड परिसरात घडली. सुदैवाने या दुर्घटनेत जीवित हानी झाली नाही. मात्र पदपथावर उभ्या असलेल्या सहा दुचाकी खड्यात पडल्या आणि दुचाकींचे मोठे नुकसान झाले आहे.

मुलुंडच्या पी.के.रोड परिसरात शुक्रवारी रात्री १० च्या सुमारास ही घटना घडली. या परिसरातील पदपथाच्या दुरुस्तीचे काम दोन वर्षांपूर्वी करण्यात आले होते. मात्र शुक्रवारी रात्री अचानक हा पदपथ चार ते पाच फूट खचला. रात्रीच्या वेळी या पदपथावरून कोणीही ये-जा करत नसल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र पदपथावर उभ्या दुचाकींचे नुकसान झाले.

आणखी वाचा-कुर्ल्यात एसआरए इमारतीला भीषण आग, ३९जण घुसमटले

स्थानिकांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली, पालिका अधिकारी आणि अग्निशमन दलाचे जवानही घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी रस्ता रोधक उभे करून दुर्घटनाग्रस्त पदपथावर प्रवेश मनाई केली. दरम्यान, निकृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदारावर कडक कारवाई करावी अशी मागणी रहिवाशांकडून करण्यात येत आहे.