मानवी आणि नैसर्गिक आपत्तींमुळे नामशेष होण्याच्या वाटेवर असलेल्या १०० पक्ष्यांमध्ये भारतातील १५ पक्ष्यांचा समावेश आहे. राज्यात आढळणाऱ्या तणमोर, माळढोक, रानपिंगळा, करकोचा तसेच गिधाडांच्या दोन जातीही यात अंतर्भूत आहेत. यातील बहुतांश पक्षी पाणथळ तसेच गवताळ भागात राहणारे असून अशा जागांमध्ये झपाटय़ाने घट होत असल्याने या पक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
‘येल विद्यापीठ’ आणि ‘झूलॉजिकल सोसायटी ऑफ लंडन’ यांनी जगभरातील पक्ष्यांचा अभ्यास करून त्यातील नामशेष होण्याचा सर्वाधिक धोका असलेल्या शंभर पक्ष्यांची यादी तयार केली आहे. या यादीत काही इंच उंचीच्या चमचा तुतारीपासून ते माणसाएवढे उंच असलेल्या ‘अॅडज्युअंट करकोचा’सारखे पक्षी आहेत. या यादीतील पहिल्या दहा पक्ष्यांमध्ये भारतातील बंगाल तणमोर व महाराष्ट्रातील रानपिंगळय़ाचा समावेश आहे. बंगाल तणमोराची संख्या जगभरात केवळ एक हजार उरली आहे. रानपिंगळा हा तब्बल ११३ वर्षांनी पुन्हा एकदा १९९७ साली मेळघाटात दिसला. मात्र हा पक्षी अजूनही दुर्लभ आहे.
यांची संख्या घटतेय
गवताळ प्रदेश आणि खुरटय़ा जंगलांचे आकुंचन झाल्याने बंगालचा तणमोर, तणमोर, माळढोक, समूह टिटवी आणि जेर्डनचा धाविक यांची संख्या झपाटय़ाने कमी झाली. चमचा तुतारी (स्पून बील्ड सॅण्डपायपर), सायबेरीन क्रौंच आणि पांढऱ्या पोटाचा वंचक हे पक्षी पाणथळ प्रदेशात राहतात. मेळघाट परिसरात दिसलेला रानपिंगळाही मध्य भारतातील जंगलावरील आक्रमणामुळे दुर्मीळ होत असल्याचे निरीक्षण आहे.
यांची अस्तित्वाची लढाई
राज गिधाड, पांढरे गिधाड, जेर्डनचा धाविक, तणमोर, चमचा तुतारी, समूह टिटवी, सायबेरीयन क्रौंच, माळढोक, अॅडज्युटंट करकोचा, पांढऱ्या पोटाचा वंचक, वूड स्नाइप, मुखवटा फिनफुट आणि क्रिसमट बेट पाणपक्षी हे इतर १३ पक्षीही अस्तित्वाची लढाई देत आहेत.
पाणथळजागा किंवा गवताळ प्रदेशाच्या संरक्षणासाठी भारतात फार कमी प्रयत्न झाले आहेत. प्रत्यक्ष ठिकाणावर जाऊन केलेल्या संशोधनावर आधारित संरक्षण प्रकल्प राबवल्यास हे पक्षी वाचू शकतील.
– डॉ. असद रहमानी, संचालक, बॉम्बे नॅचरल
हिस्ट्री सोसायटी