मुंबई: वर्सोवा ते दहिसर या सागरी किनारी रस्ता प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी सहा कंत्राटदार अखेर निश्चित करण्यात आले आहेत. त्यात लार्सन एण्ड टुब्रो, जे कुमार- एनसीसी, मेघा इंजिनिअरींग, एपको इन्फ्राटेक प्रा. लि. या कंपन्यांना ही कामे देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. एकूण १८.४७ किमी हा मार्ग असून याकरीता १६,६२१ कोटींचा खर्च अंदाजित आहे. यामध्ये चारकोप ते माईंडस्पेस मालाड पर्यंत समांतर बोगदा खणण्याचे काम मेघा इंजिनिअरींगला देण्यात आले असून ही कंपनी पालिकेच्या वादग्रस्त रस्ते कंत्राटातील कंत्राटदार कंपनी आहे. या कंपनीलाही रस्ते काम रखडवल्यामुळे यापूर्वी दंड करण्यात आला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सागरी किनारा मार्ग या प्रकल्पाचे काम प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वांद्रे वरळी सी लिंकच्या दक्षिण टोकापर्यंतचे काम सध्या मुंबई महानगरपालिकेतर्फे सुरु आहे. या मार्गाची लांबी १०.५८ किलोमीटर आहे. हे काम ८२ टक्के पूर्ण झाले असून फेब्रुवारी या प्रकल्पाचा काही भाग सुरू होऊ शकणार आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने या मार्गाचा जो भाग पश्चिम उपनगरात आहे त्याकरीता निविदा प्रक्रिया राबवायला सुरूवात केली होती.

हेही वाचा… पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘थ्रीडी सेल्फी बूथ’ आणि ‘थ्रीडी सेल्फी पाॅइंट्स’साठी कोट्यवधी रुपये खर्च

ऑगस्ट महिन्यात पूल विभागाने या कामासाठी सहा टप्प्यात निविदा मागवल्या होत्या. त्याकरीता चार इच्छुक कंपन्यांनी निविदा भरल्या होत्या. या चार कंपन्यांना या सहा टप्प्यातील कामांचे कंत्राट देण्यात आले आहे. त्यातील मेघा इंजिनिअरींग आणि एनसीसी यांच्याकडे रस्ते कॉंक्रीटीकरणाची कामेही आहेत. तर एलएण्डटी यां कंपनीकडे सागरी किनारा मार्गाच्या एका टप्प्याचे काम सुरू आहे. जे कुमार या कंपनीला गोरेगाव मुलुंड जोडरस्त्याचे कामे देण्यात आले आहे.

खर्च २४ हजार कोटींवर जाणार

वर्सोवा ते दहिसर या मार्गासाठी सहा भाग करण्यात आले आहेत. या प्रत्येक टप्प्याचे काम सुमारे अडीच हजार कोटींचे आहे. या मार्गाच्या कामासाठी १६,६२१ कोटींचा खर्च अंदाजित आहे. तर सर्व कर धरून हा प्रकल्पा२४ हजार कोटींपर्यंत जाणार आहे. हे काम चार वर्षात पूर्ण करण्याचे उद्दीष्टय पालिका प्रशासनाने ठरवले आहे. यापैकी बांगूर नगर ते माईंडस्पेस मालाड या दुसऱ्या गोरेगाव मुलुंड जोड रस्त्याला ४.४६ किमीचा एक जोड (कनेक्टर) देण्यात येणार आहे. त्यामुळे हा टप्पा महत्त्वाचा मानला जात आहे. या संपूर्ण मार्गावर पूल, बोगदा, उन्नत मार्ग अशी गुंतागुंतीची रचना आहे. दरम्यान, दहिसर भाईंदर उन्नत रस्त्यासाठीही कंत्राटदार निश्चित करण्याची प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. त्यामुळे भविष्यात हे सर्व टप्पे पूर्ण झाल्यानंतर मरीन ड्राईव्ह येथून सागरी किनारा मार्गावरून थेट भाईंदर पश्चिमपर्यंत जाता येणार आहे.

या प्रकल्पाच्या सहा कंत्राटदारापैकी मेघा इंजिनिअरींग ऍण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीला पश्चिम उपनगरातील रस्त्यांची कामे देण्यात आली होती. रस्त्यांची कामे रखडवल्यामुळे पालिकेने एप्रिल २०२३ मध्ये तीन कंपन्यांना दंड केला होता. त्यात या कंपनीचाही समावेश होता व या कंपनीला साडे तीन कोटींची दंड करण्यात आला होता.

असे आहेत टप्पे आणि कंत्राटदार

पॅकेज ए….वर्सोवा ते बांगूर नगर….एपको इन्फ्राटेक प्रा. लि.
पॅकेज बी …. बांगूर नगर ते माईंडस्पेस मालाड…..जे कुमार- एनसीसी,
पॅकेज सी …. माईंडस्पेस मालाड ते चारकोप उत्तरेकडे जाणारा बोगदा …….मेघा इंजिनिअरींग ऍण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड
पॅकेज डी….. चारकोप ते माईंडस्पेस दक्षिणेकडे जाणारा समांतर बोगदा …..मेघा इंजिनिअरींग ऍण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड
पॅकेज ई ….. चारकोप ते गोराई …..लार्सन एण्ड टुब्रो
पॅकेज एफ……गोराई ते दहिसर …..एपको इन्फ्राटेक प्रा. लि.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Six contractors have been finally selected for the second phase of the versova to dahisar coastal road project mumbai print news dvr
Show comments