Mumbai Bank Fraud News: सामान्य नागरिक आपला पैसा बँकेत सुरक्षित राहावा म्हणून खात्यात ठेवत असतात. शिवाय, बँकेच्या इतर योजनांमधून ठेवींवर अतिरिक्त नफा मिळावा असाही अनेकांचा हेतू असतो. पण बँकेत पैसे म्हणजे आपल्याला निश्चिंतता असंच साधारणपणे प्रत्येकाचं गणित असतं. पण अंधेरीतील एका खासगी बँकेत चक्क बँकेतल्याच उच्चपदस्थांनी ठेवीदारांच्या निधीवर डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बँकेतून तब्बल २ कोटींची रक्कम या पदाधिकाऱ्यांनी भलत्याच खात्यात वळवल्याचं उघड झालं आणि कारवाईसाठीची सूत्र हलली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेमकं काय घडलं?

अंधेरी एमआयडीसी पोलिसांनी परिसरातील एका खासगी बँकेच्या सहा पदाधिकाऱ्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. यात रिषभ यादव, सागर मिश्रा, अजय यादव, श्याम सुंदर चौहान, सिद्धार्थ पटनाईक आणि विकी शिंदे अशी या पदाधिकाऱ्यांची नावं असल्याचं इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे बँकेच्याच नवीन खाते विभागाचे प्रमुख सचिन सुरेश राऊत यांच्या तक्रारीच्या आधारावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुरेश राऊत यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, बँकेची स्वत:ची एकूण सहा खाती आहेत. यात बँकेचा निधी जमा करण्यात आला आहे. यापैकी दोन खात्यांमधून किमान दोन कोटी रुपये इतर वैयक्तिक खात्यांमध्ये कोणत्याही परवानगीशिवाय वळवण्यात आल्याची बाब सुरेश राऊत यांच्या तक्रारीतून समोर आली आहे. अंधेरीतील या शाखेत बँकेच्या खात्यांचा वापर करण्याचे अधिकार असणाऱ्या एकूण १५ व्यक्ती आहेत. त्यापैकी सहा पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कधी घडली फसवणूक?

बँकेच्या सेंट्रल फ्रॉड मॉनिटरिंग युनिटला ३ एप्रिल २०२३ ते ४ नोव्हेंबर २०२४ यादरम्यान सहा आरोपींनी बँकेच्या खात्यांमधून केलेल्या व्यवहारांवर संशय आला. त्यानंतर या पथकानं चौकशी सुरू केली आणि त्यात यूपीआय तक्रार निवारण विभागात काम करणाऱ्या सिद्धेश पटनाईक याने कोणत्याही परवानगीशिवाय बँकेच्या खात्यातून त्याचा सहकारी विकी शिंदेच्या लॉगइन प्रणालीवरून मोठी रक्कम ट्रान्स्फर केल्याचं निदर्शनास आलं. पटनाईक यानं ही रक्कम अजय यादव, रिषभ यादव आणि श्याम सुंदर चौहान यांच्या खात्यावर ट्रान्स्फर करून नंतर त्यांच्याकडून रोख रक्कम घेतल्याचं दाखल तक्रारीत म्हटलं आहे.

सविस्तर चौकशी केल्यानंतर बँकेनं आरोपींच्या बँक अकाऊंट स्टेटमेंटसह पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. बँकेकडून या सहा आरोपींना तातडीने सेवेतून निलंबित केलं आहे. या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल झाला असला, तरी अद्याप कुणालाही अटक केली नसून सविस्तर तपास चालू आहे, अशी माहिती एमआयडीसी पोलिसांनी दिली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Six employees of mumbai andheru private bank booked for siphoning 2 crores pmw