मुंबईत दिवसाढवळ्या फ्लॅट फोडून फिल्मी स्टाइल चोरी करण्यात आली आहे. सात चोरांनी सहा फ्लॅट्समध्ये घुसखोरी करत ही चोरी केली आहे. फक्त 90 मिनिटांत चोरांनी सोनं, रोख पैसे आणि लाखोंची किंमत असणारी घड्याळं चोरी करत पळ काढला. अंधेरीतील मरोळ परिसरात ही चोरी झाली आहे. सातव्या फ्लॅटमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत असताना कुत्रा भुंकल्याने त्यांचा प्रयत्न फसला आणि त्यांनी आहे तो मुद्देमाल घेऊन पळ काढण्याचं ठरवलं.

चोरी झाल्याने सध्या इमारतीतील रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे. 27 ऑगस्टपासून तिसऱ्यांदा अशाप्रकारे चोरी झाली आहे. आतापर्यंत एकूण 13 फ्लॅट्समध्ये चोरी झाली आहे. तेच चोर वारंवार चोरी करत असावेत अशी रहिवाशांना शंका असून, जर वेळीच त्यांना रोखलं नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाईल अशी त्यांना भीती आहे. एमआयडीसी पोलिसांकडे तक्रार करुनही ते कारवाई करत नसल्याचा रहिवाशांचा आऱोप आहे.

‘एमआयडीसी पोलिसांची वारंवार भेट घेऊनही काही फायदा झालेला नाही. इमारतीत अनेक ज्येष्ठ नागरिक एकटे राहत असून त्यांना प्रचंड भीती वाटत आहे’, असं एका रहिवाशाने सांगितलं आहे.

रविवारी रात्री 2.30 वाजता सात लोक इमारतीत प्रवेश करत असल्याचं सीसीटीव्हीत दिसत आहे. चोरी करुन झाल्यानंतर 4 वाजता चोर पळून जातानाही त्यात दिसत आहे. फ्लॅटमध्ये चोरी करण्याआधी चोरांनी शेजारील घरांना बाहेरुन कडी लावली होती. एका रहिवाशाने सांगितल्यानुसार, परिसरात पोलीस व्हॅन फिरत असतानाही चोरांनी चोरी करण्याचं धाडस केलं.

चोरी झालेल्यांपैकी एक फ्लॅट 43 वर्षीय विजय लुईस यांचा आहे. त्यांची आई घरात एकटी राहते. ‘आई आजारी असून एका आठवड्यापुर्वी नालासोपाऱ्याला भावाच्या घरी गेली आहे. शेजाऱ्यांनी फोन केल्यानंतर मी जाऊन पाहिलं असता फ्लॅटमध्ये चोरी झाली होती. चोरांनी कपाट फोडलं होतं’, अशी माहिती विजय लुईस यांनी दिली आहे. चोरांनी 73 हजारांच्या मौल्यवान वस्तू आणि रोख रक्कम चोरी केली आहे.

दूधवाला, पेपरवाला किंवा सुरक्षारक्षक चोरांना बंद फ्लॅटची माहिती देत असावेत असा रहिवाशांना संशय आहे. ‘आम्ही सोसायटीला सुरक्षारक्षक आणि सीसीटीव्हींची संख्या वाढवण्यास सांगितलं आहे. इतक्या मोठ्या कॉम्प्लेक्समध्ये फक्त एकच वॉचमन आहे. आम्ही सीसीटीव्ही ताब्यात घेतलं असून तपास करत आहोत’, अशी माहिती डीसीपी नवीचंद्र रेड्डी यांनी दिली आहे.