लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई : दादर पूर्व येथे सराफ कंपनीच्या व्यवस्थापकाला सहा जणांनी मारहाण करून त्याच्याकडील २७ लाखांचा मुद्देमाल लुटला होता. त्याप्रकरणी माटुंगा पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली आहे. याप्रकरणी माटुंगा पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल केला होता.

लोअर परळ परिसरातील सन मिल कम्पाऊंडमध्ये वास्तव्यास असलेले बलरामकुमार पोलेंद्र सिंह (२६) व्यवस्थापक म्हणून बी.एम. ज्वेलर्स कंपनीत काम करतात. सिंह सहकारी सोमेन सैकती व तौफिक मुल्ला यांच्यासोबत १७ डिसेंबरला दादर रेल्वेस्थानक येथून लोअर परळ परिसरात जात होते. त्यावेळी रामी हॉटेलजवळ सहा व्यक्तींनी त्यांची टॅक्सी अडवली व त्यांना मारहाण करण्यास सुरूवात केली. यावेळी त्यांच्याकडील लाल रंगाच्या बॅगेमधील ३५ किलो कास्टींग गोल्ड व गोल्ड फायलिंग (६५० ग्रॅम) असा सुमारे २७ लाख रुपयांचा मुद्देमाल आरोपींनी हिसकावून घेतला. त्यानंतर आरोपींनी तेथून पलायन केले.

आणखी वाचा-‘नव्या टास्क फोर्स’ला जुन्यांचे वावडे! मुंबईतून एकही डॉक्टर नाही…

याबाबतची माहिती सिंहने कंपनीच्या मालकांना दिल्यानंतर स्थानिक माटुंगा पोलिसांकडे याप्रकरणी तक्रार केली. सिंह याच्या तक्रारीवरून माटुंगा पोलिसांनी दरोडा व मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपक चव्हाण यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ याप्रकरणी तपास पथकाची स्थापना केली. पथकातील पोलीस उपनिरीक्षक संतोष माळी, विनोद पाटील, सुनील चव्हाण, पोलीस हवालदार राहूल राजभर, नथुराम चव्हाण यांनी सीसीटीव्हीच्या मदतीन तपासाला करून तपासाला सुरूवात केली. मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी याप्रकरणी आकाश चव्हाण(३०), आतिश मिसाळ(२१), विजय मोरे(३४), सतेंद्र पांडे(२५), पारूल श्रीवास्तव(२८) व अनुज शर्मा(३६) यांना अटक केली आहे. याप्रकरणी आकाश, आतिश व विजय मोरे यांना प्रथम पोलिसांनी अटक केली.त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर संतेंद्र, पारूल व अनुज यांना पुढे अटक झाली. आरोपींकडून दोन लाख रोख, १२७ ग्रॅम सोने व सहा किलो कास्टींग गोल्ड जप्त करण्यात आले आहे.

Story img Loader