कंदील गल्लीत दिवाळीनंतरची दिवाळी; तीन महिन्यांच्या मिळकतीतून भविष्यातील योजनांची तरतूद
फडताळात पुन्हा जागच्या जागी गेलेली दाराची तोरणे, रोषणाईच्या माळा, रांगोळीचे डबे, डब्याच्या तळाशी गेलेला फराळ दिवाळीचा उत्साह ओसरल्याचे दाखवून देत असला तरी माहीमच्या कंदील गल्लीत दिवाळी आता कुठे सुरू झाली आहे. दीड-दोन महिने राबून तयार केलेल्या रंगीबेरंगी, कलात्मक कंदीलांच्या विक्रीतून जमा झालेला पैसा कुठे देवदर्शनाकरिता तर कुठे गृहोपयोगी वस्तूंच्या खरेदीकरिता कामी येणार आहे. खासगी कंपनीतील नोकरी सांभाळून कंदील बनविणाऱ्यांकरिता तर हा दिवाळीचा ‘बोनस’. काही जण या पैशातून जीवन विमा पॉलिसी काढणार आहेत तर महाविद्यालयीन तरूणांचा ‘पॉकेटमनी’ या दीड महिन्याच्या मेहनतीतून सुटला आहे. थोडक्यात दिवाळीआधी दोन-तीन महिने राबून तयार केलेल्या रंगीबेरंगी आकाशकंदीलांचा उजेडातून येथील कुटुंबांच्या इच्छाआकांक्षांचे आभाळ उजळणार आहे.
माहिमच्या कादरी वाडी, कवळे वाडी या कंदिल गल्ली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुटुंबांमध्ये बनणारे कागदी, रंगीबेरंगी कंदील हे खऱ्या अर्थाने पर्यावरणपूरक. दिवाळीत घरासमोर टांगलेल्या आकाशकंदीलांचा प्रकाश आनंद देऊन जातो. मात्र, या गल्लींमधील कंदील कारागिरांचे आनंदाचे दिवस आता सुरु झाले आहेत. आपापले कामधंदे, व्यवसाय सांभाळूनच येथील कारागीर कंदील तयार करतात. ते विकून होणारी मिळकत कारागिरांसाठी एका अर्थाने वरकमाई.
कादरी वाडीतील सुमारे ७० ते ८० मध्यमवर्गीय कुटुंबे दिवाळीत या कामात गुंतलेली असतात. साधारण सत्तर वर्षांपूर्वी वाडीत राहणाऱ्या साळगावकर कुटुंबियांनी कागदी कंदील बनवून विकण्याचा व्यवसाय सुरु केला. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन निर्मितीबरोबरच वरकमाईचा आनंद लुटत हा व्यवसाय आता येथील प्रत्येक कुटुंबात स्थिरावला आहे. दिवाळीच्या तोंडावर येथे कंदील बनवून ते विकण्यासाठीची लगबग दिसून येते. दिवाळीत रंगीबेरंगी कंदीलांनी सजलेली कादरी वाडी आता शांत झाली आहे. पण, येथील घराघरात कंदिलातून झालेल्या कमाईतून वेगवेगळे बेत आखणे सुरू झाले आहे.
पॉकेटमनी सुटला
कंदील गल्लीतली तरुणवर्ग तर कंदील बनवण्याच्या व्यवसायात मोठय़ा उत्साहाने सहभागी होत असल्याचे चित्र दिसते. कंदील विकून आलेली कमाई दिवाळीत कपडेलत्ते खरेदीसाठी उपयोगी पडते, असे नोकरी करणाऱ्या हितेश याने सांगितले. रंगीबेरंगी कंदिल साकारण्याचा आनंद तर मिळतो. परंतु, त्यांच्या विक्रीतून मिळालेल्या पैशातून ‘पॉकिटमनी’ सुटतो, असे महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या प्रथम याने सांगितले.
गेली १५ वर्षे आकाशकंदील बनवण्याचा व्यवसाय राजेश करीत आहेत. यावर्षी २५ हजारांचा माल विकत घेऊन त्यापासून २०० कंदील बनवले आणि हातोहात ते विकले गेले. त्यातून त्यांना ३० ते ४० टक्के नफा झाला. दरवर्षी मी थोडाथोडा व्यवसाय वाढवितो. माझा मूळ व्यवसाय वेगळा असल्याने दिवाळीच्या तोंडावर मिळणारी ही रक्कम माझ्यासाठी बोनस ठरते. या पैशात दर वर्षी आम्ही आमच्या मूळ गावी फिरून येतो. – राजेश राऊळ, रहिवासी.
राजेश पाटील हे गृहस्थ कामामुळे आता येथे राहत नाहीत. मात्र दिवाळीपूर्वी काही महिनेआधी ते वाडीत आपल्या मूळ घरी येऊन राहतात. गेल्या वर्षीपर्यत अर्धी कमाई पुढल्या वर्षीच्या कंदीलासाठी लागणाऱ्या मालाच्या खरेदीसाठी बँकेत साठवून ठेवायचो आणि उर्वरित रक्कम गृहोपयोगी वस्तूंची घरेदीसाठी वापरायचो. पण, यंदा मिळकतीचा बहुतांश भाग आईच्या आजारपणावर खर्च झाला. उरलेल्या पैशातून मात्र बहिणीला भाऊबीज केली. – राजेश पाटील, रहिवासी .
दादरच्या खांडगे इमारतीत राहणारे चंद्रकांत काळबेरे गेली ६०-७० वर्षे सुलेखनाचे काम करत आहेत. कंदील तयार झाल्यावर त्यावर सुलेखनाचे काम करण्याचे काम काळबेरे यांच्याकडून करवून घेतले जाते. एका मोठया कंदीलावर सुलेखनाचे काम करण्यासाठी काळबेरे ५०० रुपये मानधन घेतात. असे साधारण २० ते २५ कंदील दरवर्षी मी साकारतो. यातून मिळालेली मानधनाची रक्कम बँकेत बचत खात्यात साठवून ठेवतो. – चंद्रकांत काळबेरे, सुलेखनकार.
वडाळ्यात एरवी टोपल्या तयार करणाऱ्या रमाबाई दिवाळीत बाबूंच्या काडय़ा कंदील कारागिरांना घाऊक दरात विकतात. यातून मिळालेली मिळकत ही एका अर्थाने सणाच्या खरेदीसाठीची वाढीव कमाईच असते. कारण एका सणामुळे मिळालेली मिळकत ही तीन महिन्यांच्या टोपली विक्रीतून मिळालेल्या मिळकतीपेक्षा जास्त असते. – रमाबाई, बाबू काडय़ा विक्रेती .