मुंबई : मुंबई महानगरपालिकेने बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर देवनार पशुवधगृहात १६ ते ३० जून या कालावधीत जिवंत म्हैसवर्गीय प्राणी आणि बकऱ्यांचा बाजार भरविण्यात येणार असून दरवर्षीप्रमाणे यंदाही म्हैसवर्गीय प्राण्यांचा धार्मिक वध केवळ देवनार पशुवधगृहातच करणे बंधनकारक आहे, अशी सूचना मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केली आहे. मुंबईत इतरत्र कोठेही सदर प्राण्यांचा धार्मिक वध करता येणार नाही. अनधिकृपणे पशुवध करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर देवनार पशुवधगृहात विविध यंत्रणांकडून दिल्या जाणाऱ्या सेवा-सुविधा आणि पूर्वतयारीबाबत अतिरिक्त आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी नुकतीच आढावा बैठक घेतली. या बैठकीला राज्य पशुसंवर्धन विभागाचे सह आयुक्त डॉ. कांबळे, महानगरपालिका उप आयुक्त (विशेष) संजोग कबरे, पोलीस उपायुक्त (वाहतूक) राजू भुजबळ, देवनार पशुवधगृहाचे महाव्यवस्थापक कलीमपाशा पठाण, अग्निशमन दल व वाहतूक पोलीस आणि अन्य संबंधित विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
हेही वाचा >>> Biparjoy Cyclone : गुजरातला आज वादळी तडाखा, ‘बिपरजॉय’ची आज सायंकाळी जखाऊ बंदराला धडक
बकरी ईदच्या दिवशी आणि त्यानंतरचे दोन दिवस धार्मिक पशुवधाला परवानगी देण्यात आली आहे. म्हैसवर्गीय प्राण्यांच्या धार्मिक पशुवधाची व्यवस्था देवनार पशुवधगृहात करण्यात आली आहे. धार्मिक पशुवधासाठी अर्ज स्वीकारणे, परवानगी देणे, म्हैसवर्गीय प्राणी व बकरे आयात परवाना व कालावधी (स्लॉट) आरक्षणासाठी महानगरपालिकेने ऑनलाईन व्यवस्था केली आहे. यंदा बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिका आणि अन्य यंत्रणांच्या माध्यमातून खालील सोई-सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
– बकरी ईदच्या १५ दिवसांच्या कालावधीदरम्यान देवनार पशुवधगृहात अंदाजे ७ हजार ५०० दशलक्ष टन कचऱ्यांचे निर्मूलन करण्यासाठी रोज ३०० कामगार, ५ पिकअप व्हॅन, २ जेसीबी, ४ डंपर, मृत जनावरे वाहून नेण्यासाठी ४ वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांसाठी परिसरातील २५० सुविधा केंद्रांसह ९० मोबाइल शौचालयांचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
– व्यापाऱ्यांची नोंदणी व प्राण्यांचे आवक – जावक व्यवस्थापन करण्यासाठी क्यूआर कोड यंत्रणेचा वापर करण्यात आला आहे.
– देवनार पशुवधगृहात सुरक्षेच्या दृष्टीने महानगरपालिकेचे ३०० सुरक्षा रक्षक दोन पाळीत तैनात असतील.
– नागरिकांसाठी २ आरोग्य केंद्र आणि ४ रुग्णवाहिका तसेच जनावरांसाठी २ प्रथमोपचार केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे.
– आपत्कालीन व्यवस्थापनाच्या अनुषंगाने फायर मार्शल अग्निशामकाची व्यवस्था करण्यात आली आहे.
– पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाण्याचा निचरा करण्यासाठी पाणी उपसा करणारे सहा पंप बसवण्यात आले आहेत.
– नागरिकांच्या तक्रार निवारण व आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी २४ तास कार्यरत नियंत्रण कक्ष कार्यरत असेल. मदतीसाठी ९१४३३५३७८६, ९१४३५९६७८६, ९१४३६४७७८६, ९१४३९३१७८६ या हेल्पलाईन क्रमांकांवर संपर्क साधावा.
– देवनार येथे प्राण्यांसाठी सुमारे ७५ हजार चौरस मीटर क्षेत्रावर निवारा उभारण्याचे काम सुरू आहे. या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने ३०० डोम कॅमेरे, १२ पीटी झेड, २ व्हिडिओ वॉलसह सीसी टीव्ही यंत्रणाही कार्यरत असेल.