मुंबई महानगरपालिकेला पुन्हा एकदा भूमिगत कचरापेट्यांची आठवण झाली आहे. जमिनीखाली जागा उपलब्ध नसल्यामुळे बारगळलेला भूमिगत कचरापेट्यांचा प्रयोग पुन्हा एकदा करण्यात येणार आहे. कफ परेडमध्ये भूमिगत कचरापेट्यांसाठी दोन झाडांची कत्तल करावी लागणार आहे.
कचरापेट्यांमधून ओसंडून वाहणारा कचरा, त्यातून येणारी दुर्गंधी यातून मुंबईकरांची सुटका व्हावी म्हणून मुंबई महानगरपालिका प्रशासनाने भूमिगत कचरापेट्यांचा पर्याय आणला होता. पण जागा मिळत नसल्यामुळे हा प्रयोग अयशस्वीच ठरला होता. मुंबईत २० ठिकाणी भूमिगत कचरापेट्या बसवण्याचे महानगरपालिकेने ठरवले होते व त्याकरीता जागाही शोधण्यात येत होत्या. सव्वाचार कोटी रुपये खर्च करून कचरापेट्या बसवण्यात येणार होत्या. मात्र त्यापैकी मोजक्या सहा-सात ठिकाणीच या पेट्या बसवण्यात आल्या होत्या.
हेही वाचा >>>मुंबई: कुर्ल्यातील लाकडाच्या गोदामांना भीषण आग
मुंबईत जमिनीखाली सर्वत्र उपयोगिता वाहिन्याचे (केबल्स) जाळे पसरलेले असल्यामुळे या दोन घनमीटरच्या कचरापेट्यांसाठी जागा मिळणे मुश्किल झाले होते. त्यामुळे संपूर्ण मुंबईचा हा प्रयोग रखडला होता.आता पुन्हा एकदा भूमिगत कचरापेटीचा प्रयोग होणार आहे. दक्षिण मुंबईतील कुलाबा कफ परेड येथील कॅप्टन पेठे मार्गावर सुरक्षा उद्यानात ही भूमिगत कचरापेटी बसवण्यात येणार आहे. मात्र त्याकरिता दोन झाडे कापावी लागणार आहेत. याबाबत महानगरपालिकेच्या उद्यान विभागाने रहिवाशांकडून हरकती व सूचना मागवल्या आहेत. कपाव्या लागणाऱ्या झाडांची संख्या कमी असली तरी ही कल्पना वादात सापडण्याची शक्यता आहे.