कुलदीप घायवट
मुंबई : देशाची आर्थिक राजधानी मुंबई आणि पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध असलेला गोवा या दोन ठिकाणांना अत्यंत जलद गतीने जोडण्याचे काम वंदे भारत एक्स्प्रेसने केले आहे. कोकण आणि गोव्यातील समुद्र किनारे, हिरवीगार झाडी बघायला जाण्यासाठी प्रवासी वंदे भारत एक्स्प्रेसला पसंती देत आहेत. तसेच, एक्स्प्रेसच्या मोठय़ा तावदानाच्या खिडक्यांतून सह्याद्रीचे निसर्गरम्य दृश्य प्रवाशांना अनुभवता येत आहे. परंतु, वंदे भारतमधील आसन श्रेणीमुळे प्रवाशांचा १० तासांचा प्रवास कंटाळवाणा होत आहे. त्यामुळे लवकरच वंदे भारतमधील आसन श्रेणीत बदल करून शयनयान डबे जोडण्यात येणार आहेत. याबाबत रेल्वे मंडळाकडून नियोजन सुरू आहे.
मुंबई – गोवादरम्यानचा प्रवास सुरक्षित, आरामदायी आणि वेगवान होण्यासाठी वंदे भारत एक्स्प्रेस चालवण्यात येत आहे. मुंबई – गोव्यादरम्यानचा ५८६ किमीचा पल्ला गाठण्यासाठी पावसाळय़ाच्या वेळापत्रकानुसार सुमारे १० तासांचा अवधी लागतो. पावसाळा वगळता अन्य कालावधीतील वेळापत्रकानुसार वंदे भारतने हे अंतर अवघ्या ८ तासांत कापता येते. त्यामुळे इतर रेल्वे गाडय़ांच्या तुलनेत प्रवाशांचा वेळ सुमारे ३ ते ४ तासांचा वाचणार आहे. सध्या १० तास लागत असल्याने एकाच ठिकाणी बसून प्रवाशांच्या पाठीवर ताण येत आहे. खुर्चीचे रूपांतर आरामखुर्चीत करता येणे शक्य आहे. परंतु त्यामुळे पाठीमागच्या प्रवाशाची गैरसोय होते. त्यामुळे दहा तासांचा प्रवास प्रवाशांसाठी त्रासदायक ठरत आहे.
सेमी-हायस्पीड वंदे भारत एक्स्प्रेसची बांधणी चेन्नईस्थित इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये (आयसीएफ) झाली आहे. या वेळी आसन श्रेणी असलेली वंदे भारत एक्स्प्रेस तयार करण्यात आली. कमी तासांच्या आणि कमी किमीच्या अंतरासाठी वंदे भारत प्रवाशांसाठी हिताची ठरली आहे. मात्र, दूरवरच्या प्रवासासाठी ही एक्स्प्रेस त्रासदायक ठरत आहे. त्यामुळेच रेल्वे मंडळाने आयसीएफला शयनयान असलेल्या वंदे भारतची निर्मिती करण्याची सूचना केली आहे. तसेच आयसीएफने डिसेंबरअखेपर्यंत शयनयान असलेल्या वंदे भारत तयार करण्याचे नियोजन केले आहे. त्यानंतर दोन शहरांना जोडणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेस मार्गाचे अंतर ५५० किमीहून अधिक असेल. देशभरातील वंदे भारत एक्स्प्रेसला टप्प्याटप्याने शयनयान डबे जोडण्यात येतील.
केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी वंदे भारत एक्स्प्रेसला शयनयान डबे जोडण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे ही प्रक्रिया रेल्वे मंडळाच्या नियोजनात आहे. भविष्यात मुंबई – गोवा वंदे भारत एक्स्प्रेसला शयनयान डबे जोडण्यात येतील. – डॉ. शिवराज मानसपुरे, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे
वंदे भारत तीन स्वरूपात
- १०० किमीपेक्षा कमी अंतरासाठी वंदे मेट्रो
- १०० ते ५५० किमीसाठी वंदे चेअर कार
- ५५० किमीहून अधिक प्रवासासाठी वंदे स्लीपर (शयनयान)