मुंबई : प्रवाशांच्या सोयीसाठी पश्चिम रेल्वेच्या मुंबई उपनगरीय स्थानकांवर १४ सरकते जिने व उद्वाहक बसवण्यात येणार आहेत. दोन महिन्यात या सुविधा उपलब्ध होतील. यामध्ये सहा स्थानकात दहा सरकते जिने असल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली. एका फलाटावरून दुसऱ्या फलाटावर जाण्यासाठी काही प्रवासी रेल्वे रूळ ओलांडतात. गर्दीच्या वेळी पादचारीपूल चढण्यासाठी करावी लागणारी कसरत टाळण्यासाठी काही जण रूळ ओलांडण्याचा धोका पत्करतात आणि त्यांना प्राण गमवावा लागतो. त्यामुळे या घटना रोखण्यासाठी, तसेच  ज्येष्ठ नागरिक, अपंग, गर्भवती महिला यांच्यासह सर्वसामान्य प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे स्थानकांवर सरकते जिने आणि उद्वाहक बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या पश्चिम रेल्वे उपनगरीय स्थानकांव ७४ सरकते जिने आणि २९ उद्वाहक आहेत.

तर उपनगरीय स्थानकामध्ये मार्च २०२२ पर्यंत आणखी १० सरकते जिने आणि चार उद्वाहक बसविण्यात येणार असल्याची माहिती मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमीत ठाकूर यांनी दिली. वांद्रे स्थानकात दोन, वांद्रे टर्मिनसवर दोन, जोगेश्वरी स्थानकात एक, गोरेगाव स्थानकात दोन, मालाड आणि बोरिवली स्थानकात प्रत्येकी एक जिन्याचा समावेश आहे. तर गोरेगाव स्थानकात दोन, वांद्रे आणि कांदिवली स्थानकात प्रत्येकी एक उद्वाहक बसवण्यात येणार आहे, असे ठाकूर यांनी सांगितले.

लवकरच प्रवाशांच्या सेवेत

जानेवारी २०२० मध्ये मुंबई सेन्ट्रल स्थानकात दोन, मरिन लाईन्स स्थानकातील फलाट क्रमांक चारवर एक सरकता जिना बसवण्यात आला. यातील प्रत्येक सरकत्या जिन्यांची किंमत एक कोटी रुपये आहे. बोरिवली आणि जोगेश्वरी स्थानकात दोन सरकते जिने जानेवारी अखेरीस सुरू होतील, अशी माहिती ठाकूर यांनी दिली. याशिवाय माटुंगा रोड स्थानकात एक, दादर स्थानकात फलाट क्रमांक एक आणि पाचवर दोन, कांदिवली स्थानकात फलाट क्रमांक एकवर, मीरा रोड स्थानकातील फलाट क्रमांक चारवही उद्वाहक बसवण्यात आले आहेत. कांदिवली व गोरेगाव स्थानकात दोन उद्वाहक जानेवारीच्या अखेरीस प्रवाशांच्या सेवेत उपलब्ध होतील.