मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईतील हवेचा दर्जा खालावलेला असून, मुंबईत विषारी वायूंचे प्रमाण वाढले आहे. मात्र, शनिवारी हवेतील धूलिकणांचे प्रमाण कमी झाल्याने हवेच्या गुणवत्तेत किंचितशी सुधारणा झाली. तर, माझगाव, चेंबूर येथील हवेच्या स्थितीत कोणताही बदल झाला नसून येथील हवेची गुणवत्ता घसरल्याची नोंद ‘सफर’ या संकेतस्थळावर करण्यात आली आहे. शनिवारी मुंबईतील हवा ‘प्रदूषित’ या श्रेणीत होती.
मुंबईतील प्रदुषणाच्या पातळीत शुक्रवारी प्रचंंड प्रमाणात वाढ झाली होती. तर, मुंबईतील बहुतांश भागात नायट्रोजन डायऑक्साइडचे प्रमाण प्रचंड वाढले होते. त्यामुळे मुंबईतील दृश्यमानता कमी झाली होती. तसेच, शुक्रवारी हवेचा गुणवत्ता निर्देशांक ३०३ एक्यूआय (अतिप्रदूषित) नोंदवला गेला होता. मात्र, शनिवारी हवेच्या खालावलेल्या दर्जामध्ये किंचित सुधारणा झाली आहे. मुंबईतील प्रदुषणाच्या पातळीमध्ये घट होऊन हवा गुणवत्ता निर्देशांक २४५ (प्रदूषित) इतका नोंदवला गेला आहे. मात्र, माझगाव, वांद्रे-कुर्ला संकुल आणि चेंबूरमधील हवेतील प्रदुषण वाढल्याने स्तर ढासळला आहे. तर, कुलाबा, अंधेरी, मालाड, वरळी, बोरिवली, भांडुपसह नवी मुंबईतील हवेचा दर्जा सुधारला आहे.
हेही वाचा >>> वाघाटीचे आठही पिंजरे उभे ; संवर्धन केंद्रात तीन वाघाटीचे संगोपन
चेंबूर ३१९ एक्यूआय (अतिप्रदूषित)
माझगाव ३१३ एक्यूआय (अतिप्रदूषित)
वांद्रे-कुर्ला संकुल ३०० एक्यूआय (प्रदूषित)
कुलाबा २८० एक्यूआय (प्रदूषित)
अंधेरी २६६ एक्यूआय (प्रदूषित)
मालाड २३२ एक्यूआय (प्रदूषित)
भांडूप १६९ एक्यूआय (सामान्य)
बोरिवली १३२ एक्यूआय (सामान्य)
वरळी ९८ एक्यूआय (चांगली)
मुंबई २४५ एक्यूआय (प्रदूषित)
नवी मुंबई २४२ एक्यूआय (प्रदूषित)
स्त्रोत्र : ‘सफर’ या संकेतस्थळाच्या शनिवारच्या अहवालानुसार