मुंबई : Manipur Women Incident मणिपूरमधील दोन महिलांची विवस्त्र धिंड काढण्याच्या प्रकरणाचे विधान परिषदेत पडसाद उमटले. विरोधी बाकावरील काँग्रेससह इतर पक्षांच्या आमदारांनी सभागृहात जोरदार घोषणाबाजी केली. यावर, सभागृहाने या विषयाची गंभीर दखल घेतल्यानंतरही विरोधी आमदारांनी अशा प्रकारे वागणे बरे नाही. यातून तुमची संवेदनहीनता दिसत नाही का, अशा शब्दांत उपसभापदी डॉ.नीलम गोऱ्हे यांनी गोंधळ घालणाऱ्या आमदारांना फटकारले.
या प्रकरणावर चर्चा करण्याची मागणी भाई जगताप यांनी केली. मणिपूर देशात आहे की आणखी कुठे, असा सवाल त्यांनी केला त्यांच्या विधानावर सभागृहात भाजपचे सदस्य आणि विरोधी पक्षांचे सदस्य यांच्यात जोरदार घोषणाबाजी झाली. आमदार शशिकांत शिंदे, सचिन अहिर, प्रज्ञा सातव, अभिजित वंजारी, विलास पोतनीस यांनी मोकळय़ा जागेत येऊन सभापतीसमोर केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. सर्वोच्च न्यायालयाने याची दखल घेऊन केंद्र सरकारला याबाबतीत कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. पंतप्रधान मोदी यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. अशा प्रकरणामध्ये राजकारण करण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. काही विषय राजकारणाच्या पलीकडील असतात, अशा शब्दांत उपसभापदी गोऱ्हे यांनी विरोधकांना फटकारले.
मणिपूर महिला अत्याचाराचे विधानसभेत पडसाद; काँग्रेसचा सभात्याग
मुंबई : मणिपूरमध्ये महिला अत्याचाराच्या घटनेचे तीव्र पडसाद शुक्रवारी विधिमंडळात उमटले. मानवतेला काळिमा फासणाऱ्या या घटना असून त्याबाबत बघ्याची भूमिका घेणाऱ्या निष्क्रिय केंद्र सरकारच्या विरोधात निषेधाचा ठराव सभागृहात मंजूर करावा, अशी मागणी करीत विरोधकांनी गोंधळ घातला. मात्र अध्यक्षांनी त्यांची मागणी फेटाळल्याने विरोधकांनी सभात्याग केला.
विधानसभेत कामकाज सुरू होताच मणिपूर घटनेवर सभागृहात चर्चा करण्याची मागणी विरोधकांनी केली. काँग्रेस- राष्ट्रवादीच्या महिला सदस्यांनी आक्रमक भूमिका घेत केंद्र सरकाच्या निषेधाचा ठराव करण्याची मागणी केली. मात्र आपण लेखी प्रस्ताव द्यावा, त्यावर निर्णय घेतो असे सांगत अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विरोधकांची मागणी फेटाळून लावली. त्यानंतरही महिला सदस्यांनी अध्यक्षांच्या आसनासमोरील मोकळय़ा जागेत धाव घेत चर्चेची मागणी लावून धरली. अध्यक्षांनी मात्र त्यांची मागणी फेटाळल्यानंतर सरकारचा निषेध करीत विरोधकांनी सभात्याग केला.