मुलुंड येथील नीलमनगरमधील मोठय़ा शासकीय भूखंडावर अतिक्रमण केलेल्या भूमाफिया आणि झोपडीदादांकडून मतिमंद मुलींची छेडछाड व विनयभंग करण्यात आल्याचा एफआयआर नवघर पोलिस ठाण्यात शनिवारी नोंदविण्यात आला. या झोपडय़ा हटविण्यासाठी शनिवारी सकाळी स्थानिक नागरिक, मनसे आणि अन्य राजकीय पक्षाचे कार्यकर्ते यांच्यात हाणामारी झाली. उपनगर जिल्हाधिकारी आणि पोलिसांकडून कठोर कारवाई होत नसल्याने झोपडय़ा वाढत असून परिसरातील निवासी सोसायटय़ांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना मात्र त्रासाला तोंड द्यावे लागत आहे.
सुमारे साडेआठ हजार चौ.मीटरचा हा नीलमनगरमधील भूखंड गेल्या दोन वर्षांपासून झोपडपट्टी दादांच्या डोळ्यासमोर आहे. त्यांनी काही झोपडय़ा उभारल्यानंतर जिल्हाधिकारी व पोलिसांकडे तक्रारी करण्यात आल्या. काहीवेळा कारवाई होऊनही पुन्हा झोपडय़ा उभारल्या जात असून सध्या ३००-४०० झोपडय़ा आहेत. या लगतच्या परिसरात भारतीय तत्वज्ञान विश्वस्त मंडळाकडून मतिमंद मुलांसाठी कौशल्य प्रशिक्षण वर्ग चालविला जातो. या झोपडय़ांमधील गुंडाकडून महिलांची छेडछाड होते. त्यांनी एका मतिमंद मुलीची छेड काढल्याने तिला गेले तीन-चार दिवस त्रास झाला. त्यामुळे संस्थेच्या पदाधिकारी कश्मीरा भट यांनी नवघर पोलिसांकडे अनेकदा तक्रारी केल्यावर शनिवारी एफआयआर नोंदविण्यात आल्याची  माहिती सामाजिक कार्यकर्त्यां मेधा सोमय्या यांनी दिली.
परिसरातील नागरिकांनी उपनगर जिल्हाधिकारी संजय देशमुख यांची शनिवारी भेट घेऊन परिस्थितीची माहिती दिली आहे. शासकीय भूखंडावरील अतिक्रमण दूर करण्याची मागणी करण्यात आली असून या झोपडय़ांमध्ये काही बांगलादेशीयांचा शिरकाव झाल्याचा संशयही आहे. त्यांनी झोपडीदादांना पैसे देऊन या झोपडय़ा घेतल्या आहेत व ओळखपत्रेही मिळविली आहेत, असा आरोप करण्यात येत आहे.
आजी-माजी नगरसेवकांना अटक
मुलुंड (पूर्व) येथील अग्निशमन केंद्राजवळ सरकारी भूखंडावर गुंडांच्या पहाऱ्यामध्ये राजरोसपणे उभारण्यात आलेल्या अनधिकृत झोपडय़ा तात्काळ तोडून टाकण्याची मागणी करणाऱ्या आजी-माजी नगरसेवकांसह सहा जणांना पोलिसांनी अटक केली. मुलुंड (पूर्व) येथे अग्निशमन केंद्राजवळील सरकारी भूखंडावर अनधिकृत झोपडय़ा उभारण्यात येत असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध झाले होते. या झोपडय़ा पालिकेने हटवाव्यात अशी मागणी करणाऱ्या नगरसेवक प्रकाश गंगाधरे, कैलास पाटील आणि काही जणांना या विषयावर चर्चा करण्यासाठी स्थानिक पोलीस ठाण्यात बोलावून अटक करण्यात आली, अशी माहिती माजी नगरसेवक प्रभाकर शिंदे यांनी दिली.

Story img Loader