प्रसाद रावकर, लोकसत्ता
मुंबई : माहीम किल्ल्याला गतवैभव प्राप्त व्हावे यासाठी पालिकेने पुढाकार घेतला आहे. मात्र झोपडय़ांच्या विळख्यात अडकलेल्या या किल्ल्याच्या पुनरुज्जीवनात झोपडपट्टीवासीयांचे पुनर्वसन कळीचा मुद्दा ठरला आहे. येथील पात्र ठरलेल्या २६७ झोपडपट्टीधारकांचे मालाड अथवा कुर्ला येथे पुनर्वसन करण्याचा प्रशासनाचा मानस आहे. येत्या १५ दिवसांमध्ये त्यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.
वरळी आणि वांद्रे दरम्यान समुद्रकिनाऱ्यालगत माहीमचा किल्ला उभा आहे. सुमारे ३,७९६.०२ चौरस मीटर क्षेत्रफळावर हा किल्ला उभा आहे. साधारण १९७० च्या दशकामध्ये हा किल्लाही झोपडय़ांच्या विळख्यात अडकला. हळूहळू किल्ल्याला बकाल रुप आले. समाजकंटकांचा वावरही वाढला. त्यामुळे हळूहळू पर्यटकांनी या किल्ल्याकडे पाठ फिरवली.
पालिकेने या किल्ल्याचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय घेतला असून किल्ला आणि लगतच्या झोपडय़ांचे नुकतेच सर्वेक्षण करण्यात आले. येथे २६७ झोपडय़ा असून हे झोपडपट्टीधारक साधारण १९७० पासून येथे वास्तव्यास असल्याचे सर्वेक्षणात स्पष्ट झाले. पालिकेने झोपडपट्टीधारकांच्या पात्र-अपात्रता निश्चिती केली असून त्यामध्ये सर्वच म्हणजे २६७ झोपडपट्टीधारक पात्र ठरले आहेत. या झोपडपट्टीवासीयांचे पुनर्वसन करायचे कुठे असा प्रश्न प्रशासनासमोर ठाकला आहे.
पात्र झोपडपट्टीधारकांसाठी मालाड आणि कुर्ला परिसरामध्ये पर्यायी जागेचा शोध सुरू करण्यात आला आहे. कायमस्वरुपी पर्यायी घरासाठी जागेची निश्चिती झाल्यानंतर आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करून झोपडीधारकांना स्थलांतरित करण्यात येणार आहे, असे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. किल्ल्याच्या पुनरुज्जीवन करण्यासाठी पुरातन वास्तूविषयक वास्तुविशारदाची नियुक्ती करून किल्ल्याच्या पुनरुज्जीवनाचा आराखडा आणि प्रस्ताव तयार करण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपविण्यात येणार आहे. त्याचबरोबर निविदा तयार करून प्रशासकीय मान्यता, तांत्रिक मंजुरीअंती संबंधित प्राधिकरणांकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळविण्यात येईल. त्यानंतर आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करून किल्ल्याच्या पुनरुज्जीवनाला सुरुवात करण्यात येईल, असेही या अधिकाऱ्यांनी सांगितले.
या किल्ल्याच्या पुनरुज्जीवन आणि सुशोभीकरणानंतर मुंबईतील पर्यटनस्थळांमध्ये आणखी एका स्थळाची भर पडेल. त्यामुळे भविष्यात मुंबईकर, तसेच मुंबईला भेट देणाऱ्या देश, विदेशातील पर्यटकांना आणखी एका ऐतिहासिक पर्यटनस्थळाचे दर्शन घडेल, असा विश्वास पालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
माहीम किल्ल्यातील पात्र झोपडीधारकांचे अन्यत्र कायम स्वरुपी घरात पुनर्वसन करण्यात येणार आहे. पुरातन वास्तूविषयक वास्तुविशारदाची नियुक्ती केल्यानंतर किल्ल्याच्या पुनरुज्जीवनाचे काम हाती घेण्यात येईल.
– किरण दिघावकर, सहाय्यक आयुक्त, जी उत्तर विभाग