मुंबईला झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए) १९९५ पासून झोपडपट्टी पुनर्विकास योजना राबवत आहे. मात्र जेव्हा धारावीचा पुनर्विकास होईल तेव्हाच खऱ्या अर्थाने मुंबई झोपडपट्टीमुक्त होईल, असे मत धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे (डीआरपी) मुख्य कार्यकारी अधिकारी एस.व्ही.आर. श्रीनिवास यांनी व्यक्त केले. ‘मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन ॲट २०३४’ या विशेष परिषदेत ते बोलत होते.
हेही वाचा >>>“उद्धव ठाकरेंची मशाल विझवणार”, चंद्रशेखर बावनकुळेंचे विधान, “रुपयाप्रमाणे तुमचीही…” म्हणत आदित्य ठाकरेंनी घेतला वक्तव्याचा समाचार
‘झोपडपट्टीमुक्त मुंबई’ या विषयावरील चर्चासत्रात धारावी पुनर्विकास हा मुख्य केंद्रबिंदू होता. त्या अनुषंगाने धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या सध्यस्थितीचा आढावा घेण्यात आला. मुंबईत झोपडपट्ट्या का वाढतात आणि वाढती लोकसंख्या मुंबईसाठी मोठी समस्या ठरत आहे याबाबत श्रीनिवास यांनी विचार मांडले. गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र आणि अन्य प्रांतातून मुंबईत नागरिकांचे लोंढे येत आहे. दर दिवशी साधारण २०० कुटुंबे मुंबईत स्थलांतरित होतात. तासाला १० ते १५ कुटुंबे मुंबईत येतात. त्यामुळे झोपडपट्टी ही मोठी समस्या ठरली असल्याचे श्रीनिवास यांनी सांगितले. लोकसंख्येच्या घनतेमुळे धारावी पुनर्विकास प्रकल्प मार्गी लावणे अवघड होत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. धारावी आणि गोवंडीतील झोपडपट्टीचा पुनर्विकास होत नाही, तोपर्यंत मुंबई झोपडपट्टीमुक्त होणार नाही असेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा >>>“मराठी माणसाने तुम्हाला सहानुभूती का द्यायची?”; अंधेरी पोटनिवडणुकीवरून मनसेची उद्धव ठाकरेंवर टीका
आजघडीला अनेक झोपु योजना रखडल्या आहेत. खासगी विकासकांकडून या योजना योग्य प्रकारे मार्गी लावल्या जात नसून त्या विकासकांकडून काढून घ्याव्यात आणि सरकारने त्या मार्गी लावाव्यात असे मत खासदार गोपाळ शेट्टी यांनी व्यक्त केले. तसेच झोपडपट्टीत माळ्यावर राहणाऱ्या झोपडीधारकालाही घर द्यावे, भाडेतत्वावरील गृहप्रकल्प योजनेस प्राधान्य द्यावे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.पाच महिन्यात कामाला सुरुवात…
रखडलेला धारावी पुनर्विकास प्रकल्प आता मार्गी लावण्याचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने घेतला आहे. या प्रकल्पासाठी चौथ्यांदा निविदा काढण्यात आली आहे. ही निविदा प्रक्रिया पूर्ण करून येत्या तीन – चार महिन्यांत धारावी पुनर्विकासाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येईल अशी माहिती यावेळी श्रीनिवास यांनी दिली.
मुंबई महानगराचा चेहरा मोहरा बदलणार…
मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) माध्यमातून अनेक प्रकल्प राबविले जात आहेत. यात मेट्रो, मुंबई पारबंदर प्रकल्प (शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतू), सागरी मार्ग, उन्नत रोड, पूर्व मुक्त मार्ग विस्तारीकरण, भूमिगत मार्ग अशा अनेक प्रकल्पाचा यात समावेश आहे. त्यानुसार मेट्रो २ अ आणि ७ चा दुसरा टप्पा डिसेंबर २०२२ आणि जानेवारी २०२३ सुरू होईल, तर मेट्रो ६, ४, ९ आणि ७ अ मार्गिका दोन – तीन वर्षांत सुरू होतील, अशी माहिती श्रीनिवास यांनी दिली. मुंबई पारबंदर प्रकल्पाचे ८४ टक्के काम पूर्ण झाले असून हा प्रकल्प डिसेंबर २०२३ मध्ये पूर्ण होईल. एकूणच हे प्रकल्प पूर्ण झाल्यास मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशाचा चेहरा मोहरा बदलेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.