मुंबई : घाटकोपरमधील माता रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगरमधील १४ हजार ४५४ झोपड्यांचे सर्वेक्षण नुकतेच झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने पूर्ण केले. या सर्वेक्षणाच्या आधारे १० हजार ५०१ झोपड्या पात्र ठरल्या आहेत. पात्र झोपड्यांमध्ये पहिल्या टप्प्यातील अर्थात एन-१९ मधील ४०५३ पैकी २९३१ झोपड्यांचा समावेश आहे. तर १४ हजार ४५४ पैकी ३९५३ झोपडीधारकांनी झोपु प्राधिकरणाकडे कागदपत्रेच जमा केलेली नाही. या झोपडीधारकांनी लवकरात लवकर कागदपत्रे जमा करून पात्रतेची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन झोपु प्राधिकरणाकडून करण्यात आले आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) पूर्वमूक्त मार्ग प्रकल्पात बांधित होणाऱ्या १६९४ झोपड्यांसह संपूर्ण माता रमाबाई आंबेडकर आणि कामराज नगरमधील १४ हजार ४५४ झोपड्यांचे पुनर्वसन एमएमआरडीएच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. त्यानुसार झोपु प्राधिकरण आणि एमएमआरडीएने संयुक्त भागीदारी तत्वावर १४ हजार ४५४ झोपड्यांची पुनर्वसन योजना हाती घेतली आहे. या योजनेअंतर्गत झोपु प्राधिकरणाने मार्च २०२४ मध्ये रमाबाई नगर आणि कामराज नगरमधील ३, ३६, ४०२ चौ.मी. क्षेत्रातील एन-१९ मधील ४०५३, एन-२१ मधील ८५३९, एन-२३ मधील ९८१ आणि एन-३० मधील ६८५ अशा एकूण १४ हजार ४५४ झोपड्यांच्या सर्वेक्षणास सुरुवात केली.

सात पथकांच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेले हे सर्वेक्षण अखेर पूर्ण झाले. त्यानुसार चारही क्लस्टरमधील एकूण १० हजार ५०१ झोपड्या पात्र ठरल्याची माहिती झोपु प्राधिकरणातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. पहिल्या टप्प्यातील अर्थात क्लस्टर एन-१९ मधील ४०५३ झोपड्यांपैकी २९३१ झोपड्या पात्र ठरल्या आहेत. दरम्यान, शक्य तितक्या लवकर टप्प्याटप्प्याने भूखंड मोकळे करून एमएमआरडीएला द्यावयाचे आहेत. त्यानुसार एन-१९ मधील ४०५३ झोपड्यांपैकी आतापर्यंत २९०० झोपड्या हटवून ११ एकरचा भूखंड मोकळा करण्यात आल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

एन-१९ मधील उर्वरित झोपड्या १० एप्रिलपर्यंत हटविण्याचे नियोजन झोपु प्राधिकरणाचे आहे. झोपड्या हटविल्यानंतर एन-१९ क्लस्टरचा मोकळा भूखंड एमएमआरडीएकडे वर्ग केला जाणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्यात उर्वरित एन-२३, एन-२१ आणि एन-३० क्लस्टरचे भूखंड मोकळे करून एमएमआरडीएकडे वर्ग केले जातील. भूखंड ताब्यात आल्यानंतर एमएमआरडीएकडून बांधकामासाठी निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे.

घरभाड्यापोटी ११६ कोटी रुपये

एन-१९ मधील ४०५३ पैकी ३८२५ झोपडीधारकांचे घरभाड्याचे धनादेश झोपु प्राधिकरणाने तयार केले आहे. यापैकी ३२१८ झोपडीधारकांना धनादेश अदा करण्यात आले आहेत. घरभाड्याची ही एकूण रक्कम ११६ कोटी रुपयांच्या घरात असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

दोन वर्षापर्यंत कागदपत्र जमा करता येणार

झोपु प्राधिकरणाने १४ हजार ४५४ झोपड्यांचे सर्वेक्षण पूर्ण केले आहे. मात्र या सर्वेक्षणादरम्यान पात्रता निश्चितीसाठी ३९५३ झोपडीधारकांनी कागदपत्रेच सादर केलेली नाहीत. घरमालक जागेवर नसल्याने, घरमालक गावी गेल्याने वा इतर अनेक कारणांमुळे कागदपत्रे सादर करण्यात आलेली नाहीत. दरम्यान, कागदपत्रे जमा न केलेल्या झोपडीधारकांना दोन वर्षांच्या आत ती सादर करून पुनर्वसनाचा लाभ घेता येणार आहे. अन्यथा या विहित मुदतीत कागदपत्रे सादर न करणारे झोपडीधारक अपात्र ठरतील, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.