मुंबई : वांद्रे पूर्व येथील भारत नगरमधील १८० बांधकामांविरोधात झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने गुरुवारी सकाळी कारवाई करण्यास सुरुवात केली. मात्र या कारवाईला स्थानिक रहिवासी आणि शिवसेनेने (उद्धव ठाकरे) जोरदार विरोध केला. शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) स्थानिक आमदार वरुण सरदेसाई आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी तात्काळ कारवाईच्या ठिकाणी धाव घेऊन कारवाई रोखून धरली. या कारवाईविरोधात आंदोलन सुरू केले. यामुळे येथे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.
झोपु प्राधिकरणाने भारत नगरमधील १८० बांधकामांवर नोटीसा बजावल्या होत्या. त्यानुसार झोपु प्राधिकरणाने या बांधकामावर हातोडा चालविण्याचा निर्णय घेतला. गुरुवारी ही कारवाई करण्यासाठी अधिकारी-कर्मचारी तेथे पोहचले. मात्र कारवाई सुरुवात होताच स्थानिक रहिवाशांनी त्यास विरोध केला. ही कारवाई बेकायदा आहे, आम्ही येथे ४० वर्षांपासून राहत आहोत, असे मुद्दे उपस्थित करीत काही स्थानिक रहिवाशांनी या कारवाईला विरोध केला. तर वरुण सरदेसाई यांनीही या कारवाईला विरोध करीत कार्यकर्त्यांसह आंदोलन सुरू केले आहे.
येथे १९७० पासून राहणारे रहिवासी पात्र असल्याचा दावाही त्यांनी केला. तसेच ही कारवाई अदानी समुहाच्या प्रकल्पासाठी केली जात असल्याचा आरोपही त्यांंनी केला. दरम्यान, बांधकाम पाडण्यास संमती दिलेल्या रहिवाशांच्या घरांवर जेसीबी चालविण्यात येत आहे. मात्र काही रहिवाशांनी बांधकाम पाडण्यास संमती दिलेली नाही. असे असतानाही या घरांवरही कारवाई करण्यात येत आहे. याविरोधात सरदेसाई यांनी आंदोलन सुरू केले आहे.