मुंबई : मालेगाव येथून भिवंडी येथे एक मुंगूस, दोन पोपट (रिंगनेक पॅराकिट्स) आणि एक माकड (रीसस मॅकॅक) यांची तस्करी करणाऱ्यांना ठाणे वन विभागाने पकडले. मुंगूस, पोपट आणि माकड जप्त केल्यानंतर एका आरोपीला अटक करण्यात आली. दरम्यान, आरोपीची चौकशी केल्यानंतर भिवंडीतील एका पाळीव प्राण्याच्या दुकानात वन्यप्राण्यांच्या अवैध व्यापारात त्याचा हात असल्याचे उघडकीस आले.

वाइल्ड लाइफ वेल्फेअर असोसिएशन (डब्ल्यूडब्ल्यूए), भिवंडी वन विभाग अधिकाऱ्यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी पाळीव प्राण्यांच्या दुकानावर छापा टाकला. तपासादरम्यान मालेगाव येथून एक मुंगूस, दोन करण पोपट आणि एक माकड (रीसस मॅकॅक) यांची तस्करी करण्यात येत असल्याची माहिती मिळाली. मालेगावमधून मुंगूस, पोपट आणि माकडाची तस्करी करणाऱ्यांचा शोध घेण्यात येत आहे, असे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

हे ही वाचा…मुंबई : सीएसएमटी स्थानकाशेजारी पदपथावर महिलेवर बलात्कार

मुंगूस हा संरक्षित वन्यजीव असून मुंगसाला बंदिस्त करून ठेवणे वन्यजीव संरक्षण अधिनियन १९७२ च्या कायद्याने गुन्हा आहे. सुटका केलेले मुंगूस, पोपट आणि माकड सध्या वन विभागाच्या ताब्यात आहेत. वाइल्ड लाइफ वेल्फेअर असोसिएशनतर्फे त्यांच्यावर वैद्याकीय उपचार करण्यात येत असून काही दिवसांत त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे.

वन्यजीव तस्करी जागतिक स्तरावरील डोकेदुखी बनली असून आंतरराष्ट्रीय कायदे, सुरक्षा यंत्रणा आणि आधुनिक तंत्रज्ञान या सगळ्यांच्या प्रयत्नानंतरही त्यावर अद्याप नियंत्रण आलेले नाही. जगात दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक तस्करीही वन्यजीवांची होत असून काळी जादू, छंद, औषधासाठी वापर आणि सौंदर्य प्रसाधनांची निर्मिती आदींसाठी वन्यजीवांना आपले प्राण गमवावे लागतात. पोलीस, वन विभाग आणि वन्यप्रेमींच्या सतर्कतेमुळे गेल्या काही महिन्यांमध्ये अशा अनेक कारवायांमध्ये मोठ्या संख्येने वन्यजीव वाचवण्यात यश आले आहे. मात्र असे असले तरीही मोठ्या प्रमाणावर प्राण्यांची तस्करी होत आहे, असा आरोप वन्यप्रेमींकडून करण्यात येत आहे. छंद म्हणून वन्यप्राणी आणि पक्षी पाळणारे, तसेच तस्करांमुळे वन्यजीवांना धोका निर्माण होत आहे. ठाणे जिल्ह्यात वन्यजीव तस्करांची मोठी साखळी असून ती खंडित करण्यासाठी सगळ्या यंत्रणांना व्यापक उपाययोजना करण्याची गरज असल्याचे प्राणीप्रेमींचे म्हणणे आहे.

हे ही वाचा…बनावट पारपत्राच्या आधारे परदेशात जाण्याचा प्रयत्न, विमानतळावरून महिलेला अटक

दरम्यान, ठाण्यात गेल्या दोन वर्षांमध्ये वन्यप्राणी, पक्ष्यांची तस्करी करणाऱ्या तस्करांची मोठ्या प्रमाणात धरपकड करण्यात आली आहे. मात्र प्राणी, पक्ष्यांची तस्करी सुरूच आहे. प्राणी-पक्ष्यांची सर्रास विक्री होत आहे. नव्य प्राणी आणि पक्ष्यांची विक्री करणाऱ्यांना अटक होते. परंतु खरेदी करणारे मोकाट आहेत, असा आरोप प्राणीप्रेमींकडून करण्या येत आहे.

हे ही वाचा…मुंबईचे ३४ टक्के पाणी जाते कुठे?

यापूर्वी तस्करी केलेले प्राणी

काही महिन्यांपूर्वी ४८ करण पोपट (अलेक्झांड्रिन पॅराकिट्स) आणि सात कासवांची तस्करी करणारे दोन ट्रक पकडण्यात आले होते. याप्रकरणी वन विभागातील अधिकारी अधिक तपास करीत आहेत.