मुंबई : दिल्लीहून मुंबईत महागड्या विदेशी मद्यांची तस्करी करणाऱ्याला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने ताब्यात घेतले. या तस्कराच्या मोटारीतून आणि घरातून विदेशी मद्याच्या तब्बल २०५ बाटल्या हस्तगत करण्यात पथकाला यश आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दिल्लीतून आलेला विदेशी मद्याचा साठा बेकायदेशीरपणे एका व्यक्तीकडे असल्याची माहिती भरारी पथक-२ ला मिळाली. ती व्यक्ती वरळी येथे येणार असल्याची माहिती मिळताच निरीक्षक प्रकाश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सतीश शिवलाल पटेल (३५) याला मोटरगाडीतून विदेशी मद्यांची तस्करी करताना वरळी येथे पकडले. त्याच्या गाडीची तपासणी केली असता मद्याच्या काही बाटल्या आढळल्या.

हेही वाचा…मुंबई : ५४ लाखांच्या हेरॉइनसह एकाला अट

त्यानंतर, चौकशीत राहत्या घरात आणखी मद्यांचा साठा केला असल्याचे सतीश याने सांगितले. त्यानुसार, पथकाने सतीश याच्या अंधेरी लोखंडवाला येथील अलिशान घराची तपासणी केली असता तेथे विदेशी मद्याच्या विविध कंपन्यांच्या १०८ बाटल्या सापडल्या. तब्बल १४ लाख ३९ हजार रुपये किमतीच्या त्या विदेशी स्कॉचच्या बाटल्या असून गुन्ह्यात वापरलेली गाडी देखील हस्तगत करण्यात आली आहे.

हेही वाचा…स्वेच्छानिवृत्तीच्या मागणीसाठी वंचितचा धुळे येथील उमेदवार उच्च न्यायालयात

सतीश याच्याकडे सापडलेला विदेशी मद्यांचा साठा गुरगावहून दिल्ली आणि दिल्लीहून रेल्वेने मुंबईत आणण्यात आला होता. मोहम्मद नावाचा व्यक्ती दारूची मागणी करून ते मुंबईत आणतो. त्यानंतर ते मद्य मुंबईत विकण्यासाठी माझ्याकडे देतो, अशी माहिती सतीशने चौकशीत दिल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. भरारी पथक मोहम्मदचा शोध घेत आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Smuggling liquor from delhi to mumbai state excise department seizes 205 bottles of foreign liquor arrests one man mumbai print news psg